खेडनजीकची गावे सेझमुक्त, राजू शेट्टींनी मानले आभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 04:35 AM2018-05-12T04:35:16+5:302018-05-12T04:35:16+5:30
केंद्र आणि राज्य सरकारच्या ध्येयधोरणांवर सध्या सडकून टीका करीत असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा.राजू शेट्टी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन सत्कार केला.
मुंबई : केंद्र आणि राज्य सरकारच्या ध्येयधोरणांवर सध्या सडकून टीका करीत असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा.राजू शेट्टी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन सत्कार केला.
निमित्त होते, राजगुरूनगर-खेडमधील निमगाव, कणेरसर, दाडी व केंदूर ही या चार गावांशी संबंधित विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) रद्द करण्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचे. ज्यांच्या भरवशावर राज्याचा डोलारा उभा आहे, त्या शेतकरी बांधवांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ नये, अशीच शासनाची भूमिका आहे. त्यातूनच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास प्राधान्य दिल्याचे मुख्यमंत्री या वेळी म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले की, खेडमधील या सेझचा अभ्यास केला असता, शेतकºयांवर अन्याय आणि फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे शेतकºयांना न्याय मिळवून दिला पाहिजे, या विचाराने सेझ रद्द केला. संघर्षाच्या वेळी संघर्ष आणि त्याला यश आल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करण्याचे असे क्षण विरळेच येतात, असे नमूद करून, खेड परिसरातील या शेतकºयांना विकासासाठी नेहमीच पाठबळ दिले जाईल, असाही विश्वासही मुख्यमंत्र्यांनी दिला.
खा. शेट्टी म्हणाले, सेझ रद्द करून आणि त्यानंतर जमीन हस्तांतरण शुल्क माफ करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वसामान्यांना न्याय देणारी आणि रास्त भूमिका घेतली आहे.
शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना खेडमध्ये होणाºया कृतज्ञता मेळाव्यासाठीचे निमंत्रणही दिले.
राजगुरूनगर- खेड मधील या चार गावांतील सुमारे बाराशे पन्नास हेक्टर जमीन २००७ मध्ये अधिग्रहित करण्यात आली होती. करारानुसार १५ टक्के जमिनी परतावा स्वरूपात प्रकल्प बाधितांना परत देण्यास मान्यता देण्यात आली होती, पण या जमिनीच्या हस्तांतरणासाठी मुद्रांक शुल्क म्हणून २३ कोटी द्यावे लागणार होते. हे शुल्क माफ करण्यात आले आहे. त्यामुळे आता जमिनींच्या हस्तांतरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
या शिष्टमंडळात अॅड. योगेश पांडे, यांच्यासह काशिनाथ दौंडकर, विष्णू दौंडकर, मारुती होर्डे, राजाराम होर्डे, राहुल सातपुते आदींचा समावेश होता.