खेरवाडी पुलाची मार्गिका खुली
By admin | Published: April 20, 2015 02:47 AM2015-04-20T02:47:20+5:302015-04-20T02:47:20+5:30
गेले काही दिवस वाहतूक कोंडीचे कारण बनलेल्या खेरवाडी उड्डाणपुलाच्या उत्तरेकडे जाणाऱ्या मार्गिकेचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : गेले काही दिवस वाहतूक कोंडीचे कारण बनलेल्या खेरवाडी उड्डाणपुलाच्या उत्तरेकडे जाणाऱ्या मार्गिकेचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या उड्डाणपुलामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळाला असून, ५८० मीटरच्या या पुलाचे काम अवघ्या सहा महिन्यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ वेळेत पूर्ण करण्यात आल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केला. वांद्रे-कुर्ला संकुल(बीकेसी) हे सातत्याने आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये व्यस्त असते; हे आपण लक्षात ठेवणे गरजेचे असून, या परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक केंद्र उभारण्यासाठी आयकॉनिक इमारत बांधण्यात यावी, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला केली.
फडणवीस म्हणाले, मुंबई शहरातील दळणवळणाला योग्य वेग मिळाल्यानंतर शहराची प्रगती होण्यास वेळ लागणार नाही. ५८० मीटर लांबीच्या खेरवाडी उड्डाणपुलासह १.६ किलोमीटर लांबीचा वांद्रे-कुर्ला संकुलास पूर्व द्रुतगती महामार्गाला जोडणारा उन्नत मार्ग; या दोन्ही प्रकल्पांमुळे वांद्रे-कुर्ला संकुलास मोठा फायदा होणार आहे.
मोनो रेल्वेच्या निर्मितीत मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचा ठपका कॅगने आपल्या अहवालात ठेवला. याबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या अहवालाचा खोलात जाऊन अभ्यास करण्यात येईल.