खिद्रापुरेची पत्नी ताब्यात; रुग्णालयावर छापा
By admin | Published: March 10, 2017 01:35 AM2017-03-10T01:35:25+5:302017-03-10T01:35:25+5:30
म्हैसाळ (ता. मिरज) भ्रूण हत्याकांडातील अटकेत असलेला मुख्य संशयित डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याची पत्नी डॉ. मनीषा हिला गुरुवारी चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सांगली/मिरज : म्हैसाळ (ता. मिरज) भ्रूण हत्याकांडातील अटकेत असलेला मुख्य संशयित डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याची पत्नी डॉ. मनीषा हिला गुरुवारी चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी खिद्रापुरेच्या घरावर छापा टाकून दोन तास कसून तपासणी केली. मणेराजुरी (ता. तासगाव) येथील स्वाती जमदाडे यांचा गर्भपात करण्यासाठी वापरलेली गोळ्या व इंजेक्शन खिद्रापुरेने लपवून ठेवले होते, ते जप्त केले आहे.
दरम्यान बुधवारी अटक केलेला विजापूरचा डॉ. रमेश देवगीकर व औषधांचा पुरवठा करणारा सुनील खेडकर यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
सध्या खिद्रापुरेची कसून चौकशी सुरु आहे. स्वाती जमदाडे यांचा गर्भपात करण्यासाठी एक औषधी गोळी व इंजेक्शन दिले होते. इंजेक्शन निम्मेच वापरले होते. स्वातीचा मृत्यू झाल्याचे समजताच निम्मे इंजेक्शन व गोळ्यांचे पाकीट लपवून ठेवले आहे, अशी कबुली त्याने दिली होती. त्यानुसार हे इंजेक्शन व पाकिटातील शिल्लक एक गोळी पोलिसांनी जप्त केली.
खिद्रापुरेची पत्नी डॉ. मनीषा हिचीही कसून चौकशी सुरु आहे. पण अवैध गर्भपातासाठी पतीला कोणत्याही प्रकारची मदत केली नाही, असे ती सांगत आहे. तरीही तपासात निष्पन्न झालेल्या विविध मुद्यांवरुन तिलाही अटक होण्याची शक्यता आहे. गर्भपाताच्या व्यवसायात खिद्रापुरेने मोठी कमाई केल्याचा संशय असून, त्याच्या मालमत्तेची व बँक खात्यांची पडताळणी सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
या प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली पाचजणांची वैद्यकीय समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीची अहवाल सादर झाला आहे. खिद्रापुरेने काही पुरावे नष्ट केले आहेत. तपासातून जी काही माहिती पुढे येईल, त्यानुसार कारवाई केली जात आहे. - दत्तात्रय शिंदे, जिल्हा पोलिसप्रमुख, सांगली
डॉ. खिद्रापुरे विजापूर येथील आणखी एका डॉक्टरकडे गर्भलिंग निदान चाचणी करुन घेत होता. या डॉक्टरला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक विजापूरला रवाना झाले आहे. खिद्रापुरेला गर्भपातासाठी रूग्ण आणून देणाऱ्या तेरदाळ येथील एका एजंटाचे नावही पुढे आले आहे. येत्या एक-दोन दिवसात आणखी काहीजणांना अटक होण्याचे संकेत आहेत.