मुंबईतील अपहृत बालिका सांगलीत सापडली
By admin | Published: September 1, 2014 01:50 AM2014-09-01T01:50:30+5:302014-09-01T01:50:30+5:30
मुंबईत तीन दिवसांपूर्वी यास्मिन इस्माईल शेख या नऊ महिन्यांच्या चिमुरडीचे अपहरण झाले होते. या प्रकरणाचा छडा रविवारी सांगलीत लागला
सांगली : मुंबईत तीन दिवसांपूर्वी यास्मिन इस्माईल शेख या नऊ महिन्यांच्या चिमुरडीचे अपहरण झाले होते. या प्रकरणाचा छडा रविवारी सांगलीत लागला. तिचे अपहरण करणाऱ्या भाग्यश्री संतोष पाटील (३५, रा. विजापूर, कर्नाटक) या महिलेस अटक करण्यात आली आहे.
मुंबईच्या गिरगावमध्ये राहणाऱ्या सलमा शेख हिची मुलगी यास्मिन ही २९ आॅगस्टला घराजवळ खेळत होती. भाग्यश्रीही तिथेच राहते. दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत यास्मिनचे अपहरण झाले होते.
सलमाने तिचा शोध घेतला, मात्र ती कोठेच सापडली नव्हती. त्यामुळे रात्री उशिरा त्यांनी व्ही.पी. रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
याचा तपास करीत असताना गुन्हे अन्वेषण विभागाला भाग्यश्रीही गायब असल्याचे समजले होते. त्यांनी यास्मिन व भाग्यश्रीचे छायाचित्र राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना पाठवून शोध घेण्याचे आदेश दिले होते. विश्रामबाग पोलिसांनाही हे छायाचित्र मिळाले होते.
रविवार सकाळी गोकूळनगरमध्ये एक महिला लहान मुलाला घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांच्याकडे असलेल्या फोटोवरून ही महिला भाग्यश्री पाटीलच असल्याचे समजले. तिच्यासोबत यास्मिनही होती. पोलिसांनी भाग्यश्रीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. यास्मिनचे तिने का अपरहण केले, यासंदर्भात ती काहीही बोलत नाही.
पोलिसांनी सायंकाळी मुलीचा ताबा तिच्या आईकडे दिला. भाग्यश्रीला ताब्यात घेऊन गुन्हे अन्वेषण पथक रात्री उशिरा मुंबईला रवाना झाले. (प्रतिनिधी)