खंडणीसाठी सासऱ्याचे अपहरण
By admin | Published: January 20, 2015 12:49 AM2015-01-20T00:49:26+5:302015-01-20T00:49:26+5:30
बँकेत कॅशिअर असणाऱ्या सासऱ्याचे गुजरात कॉलनी येथील बँक आॅफ इंडियाच्या पार्किंग आवारातून जावयानेच अपहरण केले.
जावयाला अटक : ५० लाख रुपयांची मागितली खंडणी
पुणे : बँकेत कॅशिअर असणाऱ्या सासऱ्याचे गुजरात कॉलनी येथील बँक आॅफ इंडियाच्या पार्किंग आवारातून जावयानेच अपहरण केले. या जावयाने अपहरण करून व सासू व पत्नीकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागण्याचा प्रकार घडला. या प्रकरणी खंडणीविरोधी पथकाने जावयासह तिघांना अटक केली. न्यायालयाने त्याला २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
पुरुषोत्तम श्रीपाद वेर्णेकर ऊर्फ प्रशांत श्रीपाद रेवणकर (वय ३९, रा. विसावा सोसायटी, धनकवडी), सखाराम बापू आखाडे (वय ४०, रा. मोहननगर, धनकवडी), भरत दिलीप भोसले (वय २२, रा. विनजर, ता. वेल्हा) असे आरोपींचे नाव आहे. या घटनेतील सासऱ्याची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी (दि. १७) घडली. सासरे हे कोथरूड येथील बँक आॅफ इंडियाच्या गुजरात कॉलनी शाखेत कॅशिअर म्हणून नोकरीला आहेत. घटनेच्या दिवशी ते बँकेच्या पार्किंग परिसरात आले. त्यानंतर जावई पुरुषोत्तम याने त्यांना इतर साथीदारांच्या मदतीने जबरदस्तीने पळवून नेले व त्यानंतर त्याने सासू व पत्नीकडे ५० लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर १८ जानेवारी रोजी सायंकाळी धनकवडी येथील तीन हत्ती चौकात आरोपी हे मारुती कारमधून सासऱ्यांना पळवून नेत असल्याचे कळाले. खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक अनिल पाटील, सहायुक्त पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई करून तिघांना अटक केली व सासऱ्यांची सुटका केली.
आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींना अपहरणाचा हेतू काय होता, याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची सरकारी वकिलांनी केलेली मागणी न्यायालयाने ग्राह्य धरली. (प्रतिनिधी)