ठाण्यात तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण; दोन तरुणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 04:56 AM2017-07-20T04:56:08+5:302017-07-20T04:56:08+5:30

सिद्धेश्वर तलाव परिसरातील तीन अल्पवयीन मुलींचे पार्टी करण्याच्या नावाखाली अपहरण केल्यानंतर, त्यांना बीअर पाजून त्यांच्याशी लैंगिक चाळे करणाऱ्या

Kidnapping of minor girls in Thane; Two young men arrested | ठाण्यात तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण; दोन तरुणांना अटक

ठाण्यात तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण; दोन तरुणांना अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सिद्धेश्वर तलाव परिसरातील तीन अल्पवयीन मुलींचे पार्टी करण्याच्या नावाखाली अपहरण केल्यानंतर, त्यांना बीअर पाजून त्यांच्याशी लैंगिक चाळे करणाऱ्या दोन तरुणांना नौपाडा पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्यांच्या तिसऱ्या अल्पवयीन साथीदारालाही ताब्यात घेण्यात आले आहे. अपहरणानंतर घरी परतलेल्या एका मुलीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, १४ तासांमध्ये उर्वरित दोघींची सुखरूपपणे सुटका केली.
सौरभ आबोरे (१८) आणि खलील खान (१९) या दोघांनाही अटक केली असून, त्यांचा तिसरा साथीदार सूरज (१६) (नावात बदल) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे तिघेही कासारवडवली, ओवळा भागातील रहिवासी आहेत. त्यांच्यापैकी खलीलची सिद्धेश्वर तलाव भागातील शिवांगी (१६, नावात बदल) या मुलीशी अलीकडेच ओळख झाली होती. त्याने धीरज आणि सौरभ या अन्य दोन मित्रांशी तिच्या १३ आणि १६ वर्षांच्या अन्य मैत्रिणींशी ओळख घडवून आणली. गेल्या १५ दिवसांतच मैत्री झाल्यानंतर, या तीन मुलांनी त्यांना १७ जुलै रोजी सौरभच्या घरी पार्टी करण्याचे आमिष दाखविले. रात्री ११ पर्यंत परत येण्याचे त्यांनी आश्वासन दिल्याने मुलींनीही तयारी दर्शवली. त्यांना दुचाकीवरून घेऊन हे सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास ओवळा येथील घरी गेले. तिथे त्यांनी पार्टी केली, जेवण केले. मुलींना आग्रह करून बीअरही पाजली. रात्री ९.३० ते पहाटे ४.३० पर्यंत नृत्य करून, त्यांच्याशी गैरवर्तनही केले. नशेत असल्यामुळे या मुलींनाही कसलेच भान राहिले नाही. इकडे पालकांनी रात्री ११ पर्यंत मुली घरी न परतल्यामुळे, नौपाडा पोलीस ठाण्यात त्यांच्या अपहरणाची तक्रार दिली. पोलिसांनी त्यांचे मित्र, मैत्रिणी यांच्याकडे चौकशी केली. त्यांचे मोबाइल, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक अकाउंटही तपासले. दरम्यान, १८ जुलै रोजी तिघींपैकी एक १३ वर्षांची मुलगी पहाटेच्या सुमारास घरी परतली. तिला पोलिसांनी विश्वासात घेऊन रात्रभर कुठे होतीस, याची चौकशी केली. तेव्हा या ‘पार्टी’ प्रकरणाचा उलगडा झाला.
तोपर्यंत या आरोपींनी अन्य मुलींना मंगळवारी पहाटे ५ वाजताच्या दरम्यान उपवन परिसरात नेले. सकाळी ६ पोलिसांनी सौरभचे घर गाठले. घरात त्यांना आक्षेपार्ह साधनांसह दारूच्या बाटल्याही मिळाल्या, पण या मुली मिळाल्या नाही. त्यांचे मोबाइल बंद असतानाही टॉवर लोकेशन घेऊन, पोलिसांनी सकाळी ९.३० वाजता उपवन भागातून ताब्यात घेतले. रात्री ८.३० च्या सुमारास सौरभ आणि खलील यांना अटक केली. दोघांनाही न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सूरजला बालन्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यांच्याविरुद्ध अपहरण, विनयभंग आणि पोक्सो - ८ (अल्पवयीन मुलींशी लैंगिक चाळे, तसेच गैरवर्तन) या कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे.

आईच्या भीतीने ती परतली...
मुलांच्या आग्रहाखातर दोघी १६ वर्षीय मुलींनी बीअरचे काही घोट घेतले, तर तिसऱ्या १३ वर्षीय मुलीने मात्र ते घेण्यात बरीच टाळाटाळ केली. तिचे वडील रात्रपाळीसाठी कामावर गेले होते. ते परत येतील आणि आईदेखील रागावेल, म्हणून तिने पहाटेच घर गाठले आणि त्यांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली.

दहावी, बारावीतील मुलींनी काळजीपूर्वक मोबाइलचा वापर करावा. बऱ्याचदा फ्रेंडशिपच्या नावाखाली मुलींना फसविले जाते. त्यामुळे पालकांनी किशोरवयीन मुलामुलींवर लक्ष ठेवावे.
- संजय धुमाळ, पोलीस निरीक्षक

Web Title: Kidnapping of minor girls in Thane; Two young men arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.