हिंगोली जिल्ह्यात दोन मुलांसह महिलेचे अपहरण, कळमनुरी तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2018 05:51 AM2018-07-07T05:51:54+5:302018-07-07T05:51:54+5:30
तालुक्यातील सोडेगाव येथील महिलेचे दोन मुलांसह अपहरण झाल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी गुरुवारी कळमनुरी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
कळमनुरी (जि. हिंगोली) : तालुक्यातील सोडेगाव येथील महिलेचे दोन मुलांसह अपहरण झाल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी गुरुवारी कळमनुरी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
सुरेखा गंगाराम कुरूडे (३५) असे महिलेचे नाव आहे. ती माहेरी सोडेगाव येथे आली होती. सोमवारी ती आपल्या गणेश (७) व जयश्री (५) दोन मुलांसह नांदापूर येथून रेल्वेने सासरी सिरळीकडे जाण्यास निघाली होती. पोटात दुखत असल्याने ती चोंढी आंबा येथे उतरली. शिरडशहापूरकडे जायचे असल्याने रस्त्याच्या कडेला थांबली असताना अचानक तेथे एक कार उभी राहिली. दोन्ही मुलांना कारमध्ये घेतले. कार शिरडकडे जाणार असल्याचे सांगितल्याने महिलाही कारमध्ये बसली. प्रवासादरम्यान फोन घरी लावत असताना तिचा मोबाईल हिसकावून घेतला. नंतर फोन बंद केला. गुरूवारी भाऊ बालू बेले यांच्या फोनवर महिलेचा फोन आला. तिने घडलेला प्रकार आपल्या भावाला सांगितले. मला सध्या अहमदनगर जिल्ह्यात नारायणगावजवळ आंदरुण गावातील शेतात ठेवलेले आहे. बाजूलाच कार असल्याचेही ती फोनवर सांगत होती. नंतर हा फोन बंद येत होता. याप्रकरणी महिलेच्या भावाच्या फिर्यादीवरून कळमनुरी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. या महिलेच्या शोधासाठी पथके तयार केली असून ती सांगितलेल्या ठिकाणी रवाना केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक जी.एस. राहिरे यांनी सांगितले.