नागपुरातील युवतीचे अपहरण

By admin | Published: January 7, 2017 02:50 AM2017-01-07T02:50:09+5:302017-01-07T02:50:09+5:30

अकोल्यात सुटका; लहान मुलींना घेऊन महिलेचा पळ.

The kidnapping of a youth in Nagpur | नागपुरातील युवतीचे अपहरण

नागपुरातील युवतीचे अपहरण

Next

सचिन राऊत
अकोला, दि. ६- नागपूरमधील मोमीनपुरा येथील एका खासगी रुग्णालयात कामावर असलेल्या युवतीला येथीलच दीपक नामक युवकाने प्रेमाच्या जाळय़ात ओढून तिचे एका बुर खाधारी महिलेच्या साहाय्याने तीन दिवसांपूर्वी नागपुरातून अपहरण केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री समोर आली. सदर युवतीला शुक्रवारी रात्री गुंगीचे औषध देऊन शेगाव रेल्वे स्टेशनवरून हैद्राबाद येथे नेण्यात येत असतानाच हा अपहरणाचा डाव उघड झाला. या प्रकरणी युवती बेपत्ता असल्याची तक्रारही नागपुरातील पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे.
नागपूर येथील रहिवासी असलेल्या या २१ वर्षीय युवती नागपूरमधीलच मोमीनपुरा येथील रहिवासी डॉ. खान यांच्या हॉस्पिटलमध्ये कामावर आहे. या युवतीला दीपक नामक युवकाने प्रेमाच्या जाळय़ात अडकवून तिला लग्नाचे आमिष दाखवून पळून जाण्यासाठी प्रवृत्त केले. युवतीनेही दीपकच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवत ती त्याच्यासोबत जाण्यासाठी घरून निघून आली. युवती घरून निघाल्यानंतर दीपकने तिच्या भ्रमनध्वनीवर फोन करून नागपुरातील पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका ठिकाणी येण्याचे सांगितले. त्यानुसार युवती ठरलेल्या ठिकाणावर पोहोचली; मात्र सदर ठिकाणावर दीपक उपस्थित नसल्याने तिने त्याच्याशी संपर्क केला; मात्र दीपकने सदर ठिकाणावर येण्यास नकार देत तिला काळय़ा रंगाच्या बुरख्यामध्ये बाजूलाच असलेल्या महिलेला भेटण्याचे सांगितले. युवती महिलेला भेटताच तिने दीपकची ओळख दाखवित तिला बाजूलाच एका ठिकाणी नेऊन गुंगीचे औषध दिले. त्यानंतर सदर युवती शुद्धीवर येण्याआधीच तिला अकोल्यातील एका ठिकाणी दोन दिवस ठेवण्यात आले. शुक्रवारी युवतीला हैद्राबाद येथे नेण्याची पूर्ण तयारी करण्यात आली.
बुरखाधारी महिला, अपहृत युवती आणि आणखी लहान मुलगी शेगाव रेल्वे स्टेशनवर असताना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्यांची विचारपूस केली. यामधील युवतीला गुंगीचे औषध दिले असल्याने ती स्पष्ट बोलत नव्हती तसेच बुरख्यातील युवती मराठी बोलत असल्याने त्यांना संशय आला. या ठिकाणी पोलिसांना बोलावताच बुरखाधारी महिला शौचास जात असल्याचे कारण सांगून लहान मुलीला घेऊन पळून गेली. त्यानंतर अपहृत युवतीला अकोल्यात आणण्यात आले. जीआरपी पोलिसांसमोर तिला हजर करण्यात आल्यानंतर युवतीने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला.
मुलीवर शस्त्रक्रिया झाल्याचा संशय!
नागपुरातून अपहरण झालेल्या युवतीने पोलिसांसमोर बुरखाधारी महिलेने एका लहान मुलीला सोबत आणल्याचे सांगितले. सदर मुलीच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून ितच्या गुप्त भागामध्ये नळीही टाकली असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. लहान मुलगी नागपुरातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल होती; मात्र तिच्यावर अर्धवट उपचार करूनच तिला अकोल्यात आणण्यात आले. गुरुवारी लहान मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला अकोल्यातील रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर शेगावला रवाना झाल्याचे सदर युवतीने सांगीतले.
मोठय़ा रॅकेटची शक्यता
मुलीच्या पोटावर शस्त्रक्रियेचे टाके असल्याने तसेच गुप्तांगात नळी निघाल्याने या मुलीच्या शरीरातील काही भाग काढल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. एका मुलीची प्रकृती ठीक नसताना आणि दुसर्‍या युवतीचे अपहरण करून त्यांना हैदराबाद येथे नेण्याची तयारी सुरू असल्याने यामध्ये मोठे रॅकेट असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. लहान मुलीवर किडनीसंदर्भात उपचार करण्यात येत असल्याचे अपहृत युवतीने शुक्रवारी पोलिसांना सांगितले, असून या दिशेने पोलिसांनी तपास करण्याची गरज आहे.
संभाजी ब्रिगेडचा पुढाकार
संभाजी ब्रिगेडचे काही कार्यकर्ते शेगाव रेल्वेस्थानकावर होते. त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी महानगराध्यक्ष पवन महल्ले यांना माहिती दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी युवतीची सुटका केली. यावेळी अमोल इंगोले, राहुल लोहिया, सागर तिवारी, कैलास पवार, संदीप बाथो यांनी प्रयत्न केले.

युवतीला पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. ती नागपुरातून बेपत्ता झाल्याची माहिती आहे. तिला ताब्यात घेऊन नागपूरमधील तीच्या कुटुबीयांशी संपर्क साधला असून तिचे भावंडं तिला घेण्यासाठी येणार आहेत. शेगावमध्ये घडलेला प्रकार तसेच पळून गेलेल्या महिलेविषयी चौकशी करण्यात येत आहे.
- सॅम्युअल वानखडे
पोलीस निरीक्षक, जीआरपी पोलीस, अकोला.

Web Title: The kidnapping of a youth in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.