किडनी ७५०००, लिव्हर ९० हजार...! शेतकऱ्यांनी सरकारला पाठविले अवयवांचे रेटकार्ड; वडेट्टीवारांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 11:53 AM2023-11-23T11:53:45+5:302023-11-23T11:54:31+5:30
शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे हे आम्ही वारंवार सांगत आहोत. पण झोपेचं सोंग घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष सरकार करत आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.
दुष्काळग्रस्त हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांनी राज्य सरकारला अवयवांचे रेटकार्ड पाठविले आहे. यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एकनाथ शिंदे सरकारवर टीका केली आहे. कर्जाच्या डोंगराखाली दबलेला शेतकरी किती चिंतेत आहे ह्याचे भान महायुती सरकारला नाही, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.
किडनी ७५,००० रुपये/ १० नग, लिव्हर ९०,०००/ १० नग, डोळे - २५,०००/ १० नग यासह शरीरातील इतर अवयवांचे रेट कार्ड काढून दुष्काळग्रस्त हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांनी ते सरकारकडे पाठवले आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती किती गंभीर आहे आणि त्यामुळे कर्जाच्या डोंगराखाली दबलेला शेतकरी किती चिंतेत आहे ह्याचे भान महायुती सरकारला नाही. हेच शेतकरी जर आमदार, खासदार असते तर त्यांच्याकरीता खोके देण्याची तयारी या सरकारने त्वरित दाखवली असती. पण दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारकडे निधी नाही, असी गंभीर टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे हे आम्ही वारंवार सांगत आहोत. पण झोपेचं सोंग घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष सरकार करत आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे .
दहा शेतकऱ्यांनी अवयव विक्रीला काढले...
हिंगोली जिल्ह्याची निर्मिती होऊन अनेक वर्षे उलटूनही तरी जिल्ह्याचा व्हावा तसा विकास झाला नाही. कारण येथील बहुतांश शेतकऱ्यांची शेती ही पाऊसाळ्याच्या पाण्यावर अवलंबून असते. यावर्षी पिकांत शेंगा भरण्याच्या वेळेस पावसाचा मोठा खंड पडला होता. यामुळे पिकाच्या उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता होती. त्यांच्यापाठोपाठ सोयाबीन पिकावर येलो मोझॅक हा रोग पडला यामुळे यावर्षी खर्च जास्त उत्पादन कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या दुष्काळअसून नदी, ओढे कोरडे पडले आहेत. खरीप पिकात घट झाली आशा होती रब्बीपीकावर त्यावर देखील निसर्गाची अवकृपा यावर्षी परतीचा पाऊस पडला नसल्याने शेतातील तुर हरबरा वाळत आहेत, सततची नापिकी आणि बँकेकडुन घेतलेल पिक कर्ज फेडायचे कसे यामुळे हिंगोली जिल्ह्यातील दहा शेतकऱ्यांनी चक्क आपले अवयव विक्रीला काढले असल्याचे निवेदन तहसीलदारांमार्फत थेट मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे.
यामध्ये शेतकऱ्यांनी आपले अवयवांची दर निश्चित केले आहेत. यामध्ये किडनी 75 हजार रुपये, लिव्हर 90 हजार रुपये, डोळे 25 हजार रुपये असा दर शेतकऱ्यांनी ठरवून दिला आहे. शेतकऱ्यांच्या अशा मागणीमुळे हिंगोली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.