उच्च न्यायालयातील विधिज्ञानेही केली होती किडनी खरेदी!
By admin | Published: December 11, 2015 02:55 AM2015-12-11T02:55:02+5:302015-12-11T09:06:28+5:30
आरोपींनी केली किडनी खरेदी करणा-यांची नावे उघड.
अकोला: किडनी तस्करी प्रकरणातील आरोपींच्या चौकशीतून दररोज खळबळजनक माहिती समोर येत आहे. पोलीस चौकशीत आरोपींनी किडनी खरेदी करणार्या रुग्णांची नावे गुरुवारी उघड केली. यात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील एका विधिज्ञाचाही समावेश आहे. किडनी तस्करी प्रकरणामध्ये पोलिसांनी सूत्रधार शिवाजी कोळी, विनोद पवार यांच्यासह त्यांचे साथीदार देवेंद्र सिरसाट, आनंद जाधव यांना अटक केली. पोलीस आरोपींची कसून चौकशी करीत आहेत. चौकशीदरम्यान दररोज किडनी तस्करीसंबंधी खळबळजनक माहिती समोर येत आहे. आरोपींच्या चौकशीतून त्यांनी शांताबाई खरात हिची किडनी नांदुर्यातील विजया झांबड यांना, देवानंद कोमलकर यांची किडनी नंदुरबार येथील शिक्षक नाईक यांना, संतोष कोल्हटकर यांची किडनी यवतमाळ येथील डॉ. मंगला श्रोत्री यांना, संतोष गवळी यांची किडनी नागपुरातील शर्मा यांना, तर आनंद जाधव याची किडनी विनोद पवारला आणि अमर सिरसाट यांची किडनी नागपुरातील उच्च न्यायालयातील एका विधिज्ञाच्या शरीरामध्ये प्रत्यारोपित केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यातील एक किडनी श्रीलंकेतील कोलंबो येथील इस्पितळामध्ये, तर उर्वरित पाच किडन्यांचे प्रत्यारोपण औरंगाबादेतील इस्पितळामध्ये करण्यात आले.
*नागपूरच्या इस्पितळातील कागदपत्रांची तपासणी
किडनी तस्करी प्रकरणातील सूत्रधार शिवाजी कोळी याला घेऊन स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांचे पथक नागपूर येथे एका इस्पितळात गेले आहे. तेथे इस्पितळातील काही महत्त्वाच्या कागदपत्रांची पोलीस पथक तपासणी करीत आहे. शिवाजी कोळी हा किडनी विक्रीसाठी तयार झालेल्या व्यक्तींना नागपूर येथील एका इस्पितळात तपासणीसाठी घेऊन जात होता. पोलिसांनी यापूर्वी नागपुरातील दोन डॉक्टरांना अकोल्यात बोलावून त्यांची चौकशी करून जबाब नोंदविले होते.