किडनी रॅकेट - पत्राकडे दुर्लक्ष करणे पडले महागात
By Admin | Published: August 30, 2016 05:21 AM2016-08-30T05:21:24+5:302016-08-30T05:21:24+5:30
हिरानंदानी रुग्णालयात होत असलेल्या अवयव प्रत्यारोपणात पैशांचे व्यवहार होत आहेत. अवयव प्रत्यारोपण समन्वयक पैसे घेत असून याची चौकशी करावी,
मुंबई : हिरानंदानी रुग्णालयात होत असलेल्या अवयव प्रत्यारोपणात पैशांचे व्यवहार होत आहेत. अवयव प्रत्यारोपण समन्वयक पैसे घेत असून याची चौकशी करावी, असा इशारा देणारे पत्र आरोग्य सेवा संचलानालयाने हिरानंदानी रुग्णालयाला किडनी रॅकेट उघड होण्याआधीच पाठवले होते. पण, या पत्राकडे रुग्णालयाने दुर्लक्ष केले आणि कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही, असे राज्य सरकारच्या अहवालात नमूद करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
हिरानंदानी रुग्णालयात उघड झालेल्या किडनी रॅकेटनंतर वैद्यकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला. पण, हा प्रकार थांबवता आला असता. कारण, काही महिन्यांपूर्वी आरोग्य सेवा संचलनालयाने मुंबईतील काही रुग्णालयांना पत्रे पाठविली होती. या पत्रांमध्ये अवयव प्रत्यारोपण समन्वयक पैशांचा व्यवहार करत असल्याचे स्पष्ट केले होते. या रुग्णालयांमध्ये हिरानंदानी रुग्णालयाचाही समावेश होता. पण, या पत्राकडे रुग्णालयाने दुर्लक्ष केले आणि पुढच्या काही दिवसांतच किडनी रॅकेट उघडकीस आले. चौकशी समितीने तयार केलेल्या अहवालात हे नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर, मूत्रपिंड प्रत्यारोपणापूर्वी दाता आणि रुग्ण यांची मुलाखत रुग्णालयाच्या समितीने घेतली होती. मुलाखतीचे व्हिडीओ शुटिंग करण्यात आले होते. पण, या व्हिडीओत फेराफार झाल्याचेही चौकशी समितीने अहवालात नमूद केल्याचे सुत्रांकडून समजते.
चौकशीसाठी राज्य सरकारने तीन सदस्यीय समिती नेमली आहे. पोलिसांनी हिरानंदानी रूग्णालयातील प्रत्यारोपण समन्वयकासह डॉक्टरांना अटक केली होती. (प्रतिनिधी)