किडनी रॅकेट राज्यभर; ६३ कोटींचे व्यवहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2016 04:54 AM2016-08-11T04:54:45+5:302016-08-11T04:54:45+5:30
पवईतील हिरानंदानी रुग्णालयामधून चालवण्यात येणाऱ्या किडनी रॅकेटचे जाळे राज्यभर पसरले असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे
मनीषा म्हात्रे, मुंबई
पवईतील हिरानंदानी रुग्णालयामधून चालवण्यात येणाऱ्या किडनी रॅकेटचे जाळे राज्यभर पसरले असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेले डॉक्टर अन्य रुग्णालयातही किडनी प्रत्यारोपणाचे काम करत होते. राज्यभरात ‘त्या’ रुग्णालयांचा शोध घेणे पोलिसांनी सुरू केले आहे. या प्रकरणातील अन्य दोन डॉक्टर रॅकेट उघड झाल्यापासून फरार झाले आहेत. गरीब रुग्णांच्या अवयवांचा सौदा करत, गेल्या पाच वर्षांत किडनी रॅकेटच्या माध्यमातून तब्बल ६३ कोटींचे आर्थिक व्यवहार झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
हिरानंदानी रुग्णालयातील कडनी रॅकेट १४ जुलै रोजी उघडकीस आले. याप्रकरणात किडनी प्रत्यारोपण समन्वयक निलेश कांबळेसह नऊ जणांना अटक करण्यात आली. सार्वजनिक आरोग्य सेवा विभागातील तीन सदस्य समितीकडून याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला. त्यांच्याकडून मिळालेल्या अहवालानंतर पोलिसांनी मंगळवारी रात्री रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजीत चॅटर्जी (६२), वैद्यकीय संचालक डॉ. कर्नल अनुराग गुरुनाथ नाईक (५६), नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. मुकेश मधुकर शेट्टे (४९), युरॉलॉजिस्ट डॉ. मुकेशकुमार जेठालाल शहा (५७), डॉ. प्रकाशचंद्र भास्कर शेट्टी (४४) या डॉक्टरांना अटक केली. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी न्यायालयाने त्यांना १३ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या आरोपींपैकी चौघे जण अन्य रुग्णालयातही काम करतात. प्रत्येकाचा पाच ते नऊ विविध रुग्णालयाशी संबंध आहे. त्या रुग्णालयांत अन्य डॉक्टरांच्या मदतीने ही मंडळी किडनी रॅकेट चालवत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ‘त्या’ रुग्णालयांकडेही पोलिसांनी आता आपला मोर्चा वळवला आहे. मात्र हिरानंदानी रुग्णालयाच्या सीईओला अटक झाल्यानंतर अशाप्रकारे अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर हा ेप्रकरण उघडकीस आल्यानंतर अंडरग्राऊण्ड झालेल्या दोघा डॉक्टरांचाही पोलीस शोध घेत आहेत. यातच हिरानंदानी रुग्णालयातील अन्य दोन अवैध किडनी प्रत्यारोपणामध्ये या रॅकेटचा सहभाग समोर आला आहे. याचा अहवाल प्राप्त होताच आणखी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
हिरानंदानी रुग्णालयात प्रत्यारोपण समन्वयक म्हणून काम करत असलेला कांबळे गेल्या पाच वर्षांपासून रुग्णालयात काम करत होता. ब्रिजकिशोर जैस्वालच्या (४८) प्रकरणात या रॅकेटने २१ लाखांचा सौदा केला होता. त्यात गेल्या पाच वर्षांत हिरानंदानी रुग्णालयात ३०० पेक्षा जास्त प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्याचे समजते. त्यात कांबळेने समन्वय केलेल्या १३० शस्त्रक्रियांचा समावेश आहे. ३०० पैकी किती शस्त्रक्रिया अवैध होत्या, याची तपासणी पोलिसांकडून सुरू आहे. एका अवैध प्रत्यारोपणासाठी २१ लाख यानुसार गेल्या पाच वर्षांत या रॅकेटमध्ये किमान ६३ कोटी रुपयांची कमाई झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या किडनी रॅकेट प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलीस प्रवक्ते अशोक दुधे यांनी दिली आहे.