किडनी तस्कर श्रीलंकेत!
By admin | Published: December 3, 2015 01:04 AM2015-12-03T01:04:19+5:302015-12-03T01:04:19+5:30
येथील बहुचर्चित किडनी तस्करांच्या रॅकेटचे धागेदोरे श्रीलंकेपर्यंत पोहोचल्याची माहिती बुधवारी समोर आली. किडनी प्रत्यारोपणाची संपूर्ण प्रक्रियाच श्रीलंकेत केली जात असल्याचे
- सचिन राऊत, अकोला
येथील बहुचर्चित किडनी तस्करांच्या रॅकेटचे धागेदोरे श्रीलंकेपर्यंत पोहोचल्याची माहिती बुधवारी समोर आली. किडनी प्रत्यारोपणाची संपूर्ण प्रक्रियाच श्रीलंकेत केली जात असल्याचे या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केल्यानंतर उघड झाले आहे.
गरजू, गरिबांना हेरायचे. त्यांना आधी व्याजाने पैसे द्यायचे. त्यावर चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारून थकबाकीची रक्कम फुगवायची. एकदा का सावज पूर्णत: अडकले की, पैशांसाठी त्याला जीवे मारण्याची धमकी देणे, कुटुंबीयांच्या जीवाला धोका निर्माण करण्याची भीती दाखविणे, असे प्रकार किडनी तस्करांकडून केले जातात. कर्ज दिलेली व्यक्ती अडचणीत आल्यानंतर त्याला आणखी ३ ते ४ लाख रुपयांचे आमिष दाखवून त्याला किडनी काढण्यासाठी भाग पाडण्याचे कारस्थान हे रॅकेट करते.
कोलंबोमधील डॉक्टरांशी संपर्क साधून किडनी प्रत्यारोपणाची प्रक्रिया केली जाते. डॉक्टरांची तारीख निश्चित झाली की, नागपूरमधील एका डॉक्टरकडे रूग्णाच्या सर्व तपासण्या केल्या जातात. तपासण्या झाल्यानंतर लाभार्थी व्यक्ती पैसे देते. त्यानंतर नागपूर येथेच तत्काळ पासपोर्ट काढून रूग्णाला श्रीलंकेत नेण्यात येते. तेथील नवलोक हॉस्पिटलमध्ये रूग्णाची किडनी काढली जाते. अशाच प्रकारातून जन्या शहरातील किडनी काढलेल्या दोघांनी उपरोक्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला दिली आहे. अकोल्यातील किडनी तस्करीचे हे रॅकेट केवळ भारतातच नसून आणखी काही देशांमध्ये त्याचे धागेदोरे असल्याचे तपासात समोर आले आहे. श्रीलंका हे या किडनी तस्करांचे मुख्यालय असून, हे मुख्यालय नागपुरातील एका डॉक्टरच्या इशाऱ्यावर काम करीत असल्याचे समोर आले आहे.
पासपोर्ट जप्त
देवेंद्र शिरसाट व आनंद जाधव यांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांनी संतोष गवळी व संतोष कोल्हटकर नामक दोघांच्या किडन्या काढल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी देवेंद्रच्या घरातून तीन पासपोर्ट जप्त केले आहेत. त्यातील संतोष गवळी व संतोष कोल्हटकरच्या पासपोर्टवरून ते श्रीलंकेत जाऊन आल्याचे व त्यांची किडनी काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे, आंध्र प्रदेश
कनेक्शन : किडनी काढणाऱ्याच्या नागपूर तसेच पुणे व आंध्र प्रदेशमध्येही तपासण्या करण्यात येत असल्याची माहिती उजेडात आली आहे.
पीडितांची संख्या वाढणार : अकोल्याप्रमाणेच मुंबई, ठाणे, सांगली, सोलापूर, नागपूर, इस्लामपूर येथील काही पीडित असल्याची माहिती आहे.