किडनी तस्करीचे धागेदोरे औरंगाबादपर्यंत!
By admin | Published: December 5, 2015 12:30 AM2015-12-05T00:30:38+5:302015-12-05T00:37:16+5:30
किडनी तस्करी प्रकरणाचे धागेदोरे औरंगाबादपर्यंत पोहोचले आहेत. तेथील एका हॉस्पिटलमध्ये पाच जणांच्या किडनी काढण्यात आल्याचे संशयित आरोपींच्या चौकशीतून उजेडात आले.
अकोला : किडनी तस्करी प्रकरणाचे धागेदोरे औरंगाबादपर्यंत पोहोचले आहेत. तेथील एका हॉस्पिटलमध्ये पाच जणांच्या किडनी काढण्यात आल्याचे संशयित आरोपींच्या चौकशीतून उजेडात आले. या प्रकरणी आणखी तपासासाठी दोन पथके नागपूर व सांगली येथेसुद्धा गेली आहेत.
शिवाजीनगरात राहणारे संतोष शंकर गवळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आनंद भगवान जाधवकडून त्यांनी व्याजाने पैसे घेतले होते. पैसे देणे शक्य होत नसल्याने जाधवने त्यांना किडनी देण्यास प्रवृत्त केले. जाधवने त्यांची भेट हरिहरपेठ येथील रहिवासी देवेंद्र श्रीधर शिरसाटशी घालून दिली. श्रीधरने गवळींना नागपूर येथील एका रुग्णालयात नेले.
या ठिकाणी सर्व तपासण्या करून तेथील एका मध्यस्थामार्फत किडनीच्या खरेदीदाराशी संपर्क केला आणि श्रीलंकेत कोलंबो येथील नवलोक रुग्णालयात ३ आॅक्टोबर २०१५ रोजी गवळींवर शस्त्रक्रिया करून त्यांची किडनी काढण्यात आली.
गवळींनी किडनी तस्करीचा भंडाफोड केल्यावर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी आनंद भगवान जाधव (३0) आणि देवेंद्र श्रीधर शिरसाट (४0) यांना अटक केली. हे दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. त्यांच्या चौकशीतून औरंगाबाद येथील एका हॉस्पिटलचे नाव समोर आले आणि या हॉस्पिटलमध्ये पाच जणांच्या किडनी काढण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
डॉक्टर दाम्पत्याचा नागपूरमध्ये शोध
नागपुरात स्थायिक झालेले यवतमाळ येथील डॉक्टर श्रोत्री दाम्पत्याचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकाने नागपूरकडे मोर्चा वळविला असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
संशयित शिवाजी कोळी पसार!
स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांची दोन पथके नागपूर आणि सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरकडे गेली आहेत. तेथील शिक्षक शिवाजी कोळी याचेही नाव या प्रकरणी समोर आल्याने, पोलीस त्याला ताब्यात घेण्यासाठी इस्लामपूरला गेले आहेत. परंतु, त्यापूर्वी कोळी तेथून पसार झाला.
पोलिसांची तीन पथके नागपूर, सांगली आणि औरंगाबाद येथे तपासासाठी गेली आहेत. पथके परतल्यानंतरच अधिक माहिती समोर येईल.
- चंद्रकिशोर मीणा,
पोलीस अधीक्षक, अकोला
औरंगाबादला काढल्या किडनी
शांताबाई रामदास खरात, देवानंद कोमलकर, अमर शिरसाट, संतोष कोल्हटकर यांसह आणखी एकाची किडनी औरंगाबाद येथील एका हॉस्पिटलमध्ये काढण्यात आली.