‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
By राजकुमार जोंधळे | Published: September 29, 2024 08:09 PM2024-09-29T20:09:51+5:302024-09-29T20:10:45+5:30
Killari Earthquake: ३० सप्टेंबर २०२४ राेजी किल्लारीच्या महाप्रलयंकारी भूकंपाला ३१ वर्ष पूर्ण हाेत आहेत. मात्र, आजही ‘किल्लारी’च्या आठवणी जाग्या आहेत. दरवर्षी गणेशाेत्सव काळात याची प्रकर्षाने जाणिव हाेते. गत ३१ वर्षात मराठवाड्यासह परिसराला तब्बल १२५ भूकंपाचे धक्के बसले आहेत. दरवर्षी किल्लारीत ‘ब्लॅक-डे’ म्हणून पाळला जाताे.
- राजकुमार जाेंधळे
लातूर - ३० सप्टेंबर २०२४ राेजी किल्लारीच्या महाप्रलयंकारी भूकंपाला ३१ वर्ष पूर्ण हाेत आहेत. मात्र, आजही ‘किल्लारी’च्या आठवणी जाग्या आहेत. दरवर्षी गणेशाेत्सव काळात याची प्रकर्षाने जाणिव हाेते. गत ३१ वर्षात मराठवाड्यासह परिसराला तब्बल १२५ भूकंपाचे धक्के बसले आहेत. दरवर्षी किल्लारीत ‘ब्लॅक-डे’ म्हणून पाळला जाताे.
सन २०१८ ते २०२४ या सहा वर्षाच्या काळात मराठवाड्यातील काही गावात भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाण वाढले आहे. काही गावांना साैम्य धक्के जाणवले. गत ३१ वर्षात मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगेाली जिल्ह्याला १२५ धक्के बसले आहेत. सप्टेंबर महिना उजाडला की महाप्रलयंकारी भूकंपाच्या कटू आठवणी पुन्हा जाग्या हाेतात.
१९९९ मध्ये बसले किल्लारीला ११ धक्के...
सप्टेंबर १९९३ ते सप्टेंबर २०२४ या काळात लातूर परिसराला भूकंपाचे ४८ धक्के बसले. १९९९ मध्ये किल्लारीला ११ धक्के जाणवले. लातूर, धाराशिव, किल्लारी, लाेहारा, उमगरा, सास्तूर-माकणीला सर्वाधिक धक्के बसले. १३ सप्टेंबर २०२८ राेजी ३.९ रिश्टर स्केलचा धक्का, २१ डिसेंबर २०२१ राेजी ३.९ आणि २.७ रिश्टर स्केलचे धक्के बसले. तर ७ ते २३ सप्टेंबर २०२२ मध्ये तीन साैन्य धक्के जाणवले.
२०२४ मध्ये एकही धक्का नाही...
लातूर जिल्ह्याला २०२२ मध्ये भूकंपाचे ११ धक्के बसले. याची तीव्रता १.४ पासून ३.१ रिश्टर स्केलपर्यंत हाेती. २०२३ कमी धक्के जाणवले. ऑक्टाेबर २०२३ मध्ये भूकंपाचे चार धक्के बसले. याची तीव्रता १.६ ते २़८ रिश्टर स्केल हाेती. २०२४ मध्ये भूकंपाची एकही नाेंद झाली नाही.
लातूर जिल्ह्यात तीन ठिकाणी भूकंपमापन केंद्र...
किल्लारी भूकंपानंतर लातूर जिल्ह्यात भूकंपमापन केंद्राची स्थापना केली. लातूर, औराद शहाजानी आणि आशिव (ता. औसा) येथे भूकंप मापन केंद्र असून, या केंद्रावर धक्क्यांची नाेंद हाेते.
लातूर-धाराशिवला सर्वाधिक बसले धक्के...
३० सप्टेंबर १९९३ ते २०२३ या काळात लातूर-धाराशिव जिल्ह्यांना सर्वाधिक ७३ भूकंपाचे धक्के बसले आहेत. २००० मध्ये ५ धक्के, २००३ मध्ये ५ धक्के, २००४ मध्ये ७ धक्के, २००५ मध्ये १० धक्के, २००६ मध्ये ५ धक्के, २००८ मध्ये २ धक्के, २००९ मध्ये ७ धक्के, २०१० आणि २०११ मध्ये १० धक्के, २०१२ ते २०२३ मध्ये ३६ धक्क्यांची नाेंद झाली आहे.