नाशकात युवतीची हत्त्या; मृतदेह जाळला

By Admin | Published: May 30, 2017 04:35 PM2017-05-30T16:35:38+5:302017-05-30T16:35:38+5:30

येथील म्हसरूळ परिसरातील रहिवासी असलेली एक युवती सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास बेपत्ता झाली होती.

Killed in Nashik; The bodies were burned | नाशकात युवतीची हत्त्या; मृतदेह जाळला

नाशकात युवतीची हत्त्या; मृतदेह जाळला

googlenewsNext

नाशिक : येथील म्हसरूळ परिसरातील रहिवासी असलेली एक युवती सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास बेपत्ता झाली होती. या युवतीचा मृतदेह सुमारे ९० टक्के जळालेल्या अवस्थेत मंगळवारी सकाळच्या सुमारास आढळून आला. मृतदेह जळालेल्या अवस्थेत मिळून आल्यामुळे पोलिसांपुढे युवतीची ओळख पटविण्याचे आव्हान उभे राहिले होते. पोलिसांनी तिच्या कपड्यांवरून व अन्य काही वस्तूवरून तपासाची चक्रे फिरविली दुपारी एक वाजेच्या सुमारास युवती म्हसरूळ भागातील असल्याचे तपासात पुढे आले. मुलीच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांना मृतदेह दाखविल्यानंतर त्यांनी मृतदेहाची ओळख पटविली. या युवतीचे नाव पोलिसांनी अद्याप स्पष्ट केले नसून तपासाचा भाग म्हणून काही माहिती गुप्त ठेवली जात असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांनी सांगितले.
नाशिक शहरात सातत्याने खूनाच्या घडणाऱ्या घटनांमुळे संपूर्ण शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांनी पोलिसांना आव्हान दिले आहे. पोलीस एका खूनातील संशयित ताब्यात घेत नाही तोच पून्हा दूसरी खूनाची घटना घडत असल्याने सध्या पोलीस यंत्रणा चक्रावून गेली आहे. दुसरीकडे नाशिककरांमध्ये पोलिस प्रशासनाच्या कारभाराविषयी कमालीचा संताप व्यक्त होत आहे. पोलिसप्रमुखांनी सामाजिक संस्थांच्या कार्याप्रमाणे सामाजिक उपक्रम राबविणे कमी करावे, आणि कायदा सुव्यवस्था बळकट करण्याकडे लक्ष घालावे, अशा पोस्ट सोशल मिडियावरून व्हायरल होत आहेत. एकूणच पोलिसांची नाकाबंदी, कॉम्बिंग आॅपरेशन आदि मोहिमांचा वचक अद्याप निर्माण होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे सर्व खूनाच्या घटनांचे धागेदोरे पंचवटी परिसरात आढळून येत आहे.

‘पंचवटी’मध्ये गुन्हेगारीचा अड्डा
पंचवटी परिसरात विधीसंघर्षित गुन्हेगार पाप्या शेरगिलची भरदिवसा पेठरोडवर हत्त्या झाली होती. त्यानंतर पंचवटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर दिपक अहिरे या हमालाची हत्त्या पुर्ववैमनस्यातून टोळक्याने केली होती. अवधूतवाडी येथील दिंंडोरी रस्त्यावर गुन्हेगार अजित खिच्चीची हत्त्या टोळक्याने केली होती. त्यानंतर पंचवटी कारंजा येथे अज्ञात इसमाच्या डोक्यात झोपलेला असताना दगड घालून हत्त्या क रण्यात आली होती. या हत्त्येमधील संशयित अद्याप फरार असून मृतदेहाची ओळख पटू शकलेली नाही. त्यानंतर गोदापार्क परिसरात म्हसरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका क्रिडा प्रशिक्षकावर सकाळी हल्लेखोरांनी धारधार शस्त्राने हल्ला चढविला होता. महिला खेळाडूची छेड काढण्यापासून रोखल्यामुळे हल्लेखोरांनी प्रशिक्षकावर हल्ला चढविला होता. नवनाथनगर येथे पंधरवड्यापुर्वी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या किरण राहूल निकम या युवकाची हत्त्या करण्यात आली होती. त्यादरम्यान येथील पाथरवट लेन मध्ये टोळक्यांनी शस्त्रे फिरवून वाहनांची तोडफोड करून मध्यरात्री धूडगूस घातला होता. म्हसरुळ परिसरातदेखील अशाच प्रकारे दहशत माजविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यानंतर निकम याच्या खूनाचा बदला घेण्यासाठी पंचवटीपरिसरातून काही गुन्हेगारांनी कट रचला आणि उपनगरला ‘टार्गेट’च्या चेहऱ्याच्या साधर्म्यातून टोळक्याने थेट गोळ्या झाडून व शस्त्रास्त्राने हल्ला चढवून कसारा येथून पाहुणा आलेल्या तुषार भास्कर साबळे या युवकाचा खून केला होता. एकूणच महिना ते दीड महिन्याच्या कालावधीमध्ये घडलेल्या या गुन्हेगारीच्या घटनांनी नाशिक हादरले आहे. सराईत गुन्हेगारांच्या होणाऱ्या हत्त्यांमुळे नाशकात पुन्हा टोळीयुध्दाचा भडका उडाला आहे.

Web Title: Killed in Nashik; The bodies were burned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.