हत्या बंगल्याच्या व्यवहारातून
By admin | Published: March 5, 2017 12:48 AM2017-03-05T00:48:20+5:302017-03-05T00:48:20+5:30
ज्येष्ठ विचारवंत डॉ. कृष्णा रामभाऊ किरवले (वय ६३, रा. म्हाडा कॉलनीजवळ, राजेंद्रनगर) यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मायलेकास शनिवारी अटक केली.
कोल्हापूर : ज्येष्ठ विचारवंत डॉ. कृष्णा रामभाऊ किरवले (वय ६३, रा. म्हाडा कॉलनीजवळ, राजेंद्रनगर) यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मायलेकास शनिवारी अटक केली. संशयित प्रीतम गणपती पाटील (वय ३०, रा. राजेंद्रनगर), त्याची आई मंगला गणपती पाटील (५५) अशी त्यांची नावे आहेत. बंगल्याच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून डॉ. किरवले यांची हत्या केल्याची कबुली प्रीतम पाटील याने दिली आहे. त्याने गुन्ह्यात वापरलेला एडका (एक घातक शस्त्र) व दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे.
‘‘डॉ. किरवले आणि माझ्या वडिलांचे मैत्रीसंबंध असल्याने सहा महिन्यांपूर्वी त्यांना बंगला दुसऱ्या कोणाला विकू नका, आम्हीच घेतो असे सांगितले. बाजारभावाप्रमाणे बंगल्याची किंमत ४६ लाख रुपये ठरली. मी नातेवाईक, मित्रांकडून हातउसने पैसे घेऊन २६ लाख रुपये किरवले यांना दिले. उर्वरित २० लाख रुपये रजिस्ट्रेशन करताना द्यायचे ठरले. शुक्रवारी (दि. ३) दुपारी दस्त नोंदणी कार्यालयात मी, वडील व डॉ. किरवले असे तिघेजण गेलो. बंगल्याच्या खरेदी-विक्री व्यवहाराचे संचकारपत्र केले. त्यानंतर तीनच्या सुमारास आम्ही घरी आलो. किरवले यांनी मला व वडिलांना पुन्हा चारच्या सुमारास घरी बोलावून घेतले. त्यांनी ठरलेल्या व्यवहारापेक्षा जास्त रकमेची मागणी केली. यावरून आमच्यात शाब्दिक वादावादी झाली. वडील शेजारी परीट यांच्या घरी सुतारकाम असल्याने निघून गेले. त्यानंतर मी किरवले यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. पैसे वाढवून दिल्याशिवाय रजिस्ट्रेशन करणार नाही, तुला काय करायचे ते कर, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे माझा राग अनावर होऊन मी त्यांची हत्या करुन तेथून मी पसार झालो’’, असा कबुलीजबाब प्रीतम पाटील याने दिला आहे. डॉ. किरवले यांच्या हत्ये प्रकरणी संशयित प्रीतम पाटील व त्याची आई मंगला पाटील या दोघांना अटक केली आहे. त्याच्या वडिलांचा सहभाग आढळून आल्यास त्यांनाही आरोपी केले जाईल. आरोपीने हत्येची कबुली दिली आहे. आम्ही सर्व बाजूंनी तपास करीत आहोत. असे कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे यांनी सांििगतले. (प्रतिनिधी)
पार्थिवावर अंत्यसंस्कार
- आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक डॉ. कृष्णा किरवले यांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी पंचगंगा स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
- शहरातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेत त्यांची पत्नी कल्पना, मुलगी अनघा यांच्यासह केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, ज्येष्ठ विचारवंत डॉ. गंगाधर पानतावणे, डॉ. भारत पाटणकर यांच्यासह साहित्यिक, आंबेडकर चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते. बाबांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. या हत्येमागे व्यक्तिगत कारण नक्कीच नाही. पोलिसांनी त्याचा शोध घ्यावा, अशी मागणी मुलगी अनघाने केली.