किलोमीटर दर्शक स्टोन अस्पष्ट अन् दुरवस्थेत
By Admin | Published: November 5, 2016 03:22 AM2016-11-05T03:22:40+5:302016-11-05T03:22:40+5:30
सार्वजनिक बांधकाम खाते व जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या मुख्य व प्रचंड रहदारीच्या रस्त्यांवरील किलो मीटर दर्शक शीला (स्टोन) अस्पष्ट
पंकज राऊत,
बोईसर- पालघर तालुक्याची ग्रामीण भागातील सार्वजनिक बांधकाम खाते व जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या मुख्य व प्रचंड रहदारीच्या रस्त्यांवरील किलो मीटर दर्शक शीला (स्टोन) अस्पष्ट दिसत असून त्यांची प्रचंड दुरावस्था झाल्याने वाहन चालकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होत आहे. या सुचना फलकांअभावी बाहेरील वाहन चालक भलत्याच मार्गावर जात आहेत. तसेच अपघात प्रवणक्षेत्र आणि धोकादायक वळण रस्त्यावरील सुचना फलकाअभावी अपघात नाहक निष्पाप बळी जात आहेत.
धोका विरहित विना अपघात तसचे सुरक्षित व सुखकर प्रवासा बरोबरच वेळचा अपव्यय होऊ नये या करिता दर्जेदार व खड्डेमुक्त रस्त्यांची गरज असते तेवढीच गरज स्पष्ट व ठळकपणे दिसणारे कि.मी. दर्शक स्टोन, रस्त्यांविषयी मार्गदर्शन, अपघात प्रवणक्षेत्र, धोक्याची वळणे, गतिरोधकांविषयी सुचना, पुल व अरुंद मोऱ्या इ. अनेक सुचनाचे दगड व फलक दिवसा व रात्रीच्या अंधारात ठळक व त्वरीत दिसणे अत्यंत गरजेचे असुनही या अत्यंत सुरक्षिततेच्या महत्वाच्या गोष्टीकडे दुर्दैवाने अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने पालघर तालुकयातील बहुसंख्य रस्त्यावरील माहिती फलक व सुचनांची स्थिती भयावह झाल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याची अवस्था दिशाहीन झाल्यासारखी आहे.
या अत्यंत महत्वाच्या गोष्टीची दखल सार्वजनिक बांधकाम खाते गंभिरतेने घेत नसुन वर्षानुवर्षे कि.मी. दर्शक स्टोन दुलक्षित झाले आहेत. तर पालघर जिल्हयाच्या निर्मितीला सव्वा दोन वर्षे होऊनही काही ठिकाणच्या फलकांवर अजुनही सा.बा. ठाणेचेच फलक दिसत आहेत. काही ठिकाणी रस्त्यांची उंची वाढल्याने मैलाच्या दगडांची उंची अर्ध्यावर आली आहे. तर गतिरोधकांच्या विषयी माहिती देणारे सुचना फलकही गायब झाल्यांने गतिरोधकांवर दुचाकीस्वार आपटुन गंभिर अपघात होत आहेत.
कि.मी दर्शक स्टोन व सुचना फलक अस्पष्ट आहेतच पंरतु बहुसंख्य फलक हे झाडी झुडप व वेलींनी व्यापले आहेत. काही स्टोन चा वापर तर चित्रपटाची पोस्टर्स व व्यावसायीक आपल्या जाहिराती चिटकविण्यासाठी वर्षानुवर्षे सर्रास पणे करीत आहेत. वास्तविक अशा चुकीच्या जागेवर पोस्टर व जाहिरात बाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे.
>अंधारात रस्त्याच्या कडेचा अंदाज चूकतो
पूर्वी रस्त्याच्या कडेला जी वडाची झाडे आहेत त्या झाडांच्या बुध्याला तीन ते चार फटांपर्यंत सफेद चुना व लाल गेरू रंग लावून बुंधे रगवत होते. त्यामुळे दाट अंधारात रस्त्याच्या कडेचा अंदाज वाहनचालकांना यायचा आता झाडांचे बुंधे फारसे रंगविले जात नाहीत.
झेब्रा क्रॉसिंग चे पट्टेही कूठे दिसत नसल्याने वाहन चालक सांगत आहेत तर या बाबतीत सार्वजनिक बांधकाम खात्याने गंभिर दखल घेऊन कि.मी. स्टोन दर्शक व सुचना फलक अद्ययावत करण्याची मागणी पंचायत समितीचे सदस्य सुशिल चुरी यांनी केली आहे.
धोक्याच्या वळण रस्त्यांवर सुचना फलकांअभावी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. रस्त्यांची उंची वाढल्याने मैलाच्या दगडांची उंची अर्ध्यावर आली आहे.