कायनेटिक कंपनी लिलावात, कर वसुलीसाठी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 04:35 AM2017-12-01T04:35:50+5:302017-12-01T04:36:12+5:30
मालमत्ताकराच्या ३ कोटी ३३ लाख ४८ हजार रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने कायनेटिक इंजिनिअरिंग कंपनी अखेर लिलावात काढली आहे. कंपनीची मालमत्ता महापालिकेने आधीच जप्त केली होती.
अहमदनगर : मालमत्ताकराच्या ३ कोटी ३३ लाख ४८ हजार रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने कायनेटिक इंजिनिअरिंग कंपनी अखेर लिलावात काढली आहे. कंपनीची मालमत्ता महापालिकेने आधीच जप्त केली होती. मात्र, मालमत्ता जप्त करूनही थकबाकी न भरल्याने महापालिकेने सहा डिसेंबरला कंपनीचा लिलाव काढण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेने सध्या मालमत्ताकराच्या थकबाकी वसुलीसाठीची मोहीम तीव्र केली आहे. कायनेटिक कंपनीकडे महापालिकेची साडेतीन कोटी रुपयांची मालमत्ताकराची थकबाकी आहे. वसुलीसाठी दिवाळीपूर्वीच कंपनीच्या आयटी विभागाला
सील ठोकून मालमत्ता जप्त केली. त्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापनाने जिल्हा न्यायालय आणि औरंगाबाद खंडपीठात अपिल दाखल केले. कंपनीचे दोन्हीही अपिल
फेटाळण्यात आले. त्यानंतर महापालिकेने जप्त मालमत्तेचा लिलाव करण्याचा निर्णय बुधवारी घेतला. दि. ६ डिसेंबरला दुपारी साडेबारा वाजता कंपनीच्या परिसरात लिलाव होणार असल्याची माहिती उपायुक्त राजेंद्र चव्हाण यांनी दिली. ज्यांना लिलाव प्रक्रियेत भाग घ्यायचा आहे, त्यांनी एक हजार रुपयांचे डिपॉझिट भरून सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मालमत्तेचे मालक कुंदनमल शोभाचंद फिरोदिया यांच्या नावाने जप्तीची कारवाई आहे.
महापालिका आणि कायनेटिक कंपनी यांच्यामध्ये गेल्या ३० वर्षांपासून मालमत्ताकराच्या आकारणीच्या दराबाबत वाद असून ते न्यायप्रविष्ठ आहेत. याच वादावर गत आठवड्यात जिल्हा न्यायालयाने वाद निकाली काढत महापालिकेची कर आकारणीचे दर योग्य असल्याचा निर्वाळा दिला होता. कायनेटिक कंपनीसोबत केडगाव येथील राजमोहंमद पटेल यांच्याकडे २ कोटी १२ लाख ६२२ रुपयांची थकबाकी आहे. त्यांच्याही मालमत्तेचा लिलाव होणार आहे.