कोकणच्या राजाचा झिम्मा सुरू
By admin | Published: January 30, 2016 06:14 PM2016-01-30T18:14:17+5:302016-01-30T18:35:22+5:30
यंदाच्या मोसमातील पहिल्या आंब्यानं आज कोल्हापूरच्या बाजारात हजेरी लावली.
Next
दीपक जाधव, ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. ३० - यंदाच्या मोसमातील पहिल्या आंब्यानं आज कोल्हापूरच्या बाजारात हजेरी लावली. विक्रीसाठी कोकणातून घाटमाथ्यावर आलेल्या हापूस आंब्याच्या चार डझनाच्या पहिल्या पेटीला लिलावात तब्बल ११ हजार ५०० रुपयांचा भाव मिळाला. याचा अर्थ डझनाचा भाव २,८७५ रुपये पडला असून प्रति आंब्याचा भाव २४० रुपये आहे.
कोकणचा राजा अपेक्षेपेक्षा कितीतरी आधी अवतरल्यानं करवीरच्या बाजारात उत्साहाचे वारे संचारले. पहिली पेटी सोलापूरचे प्रसिद्ध व्यापारी सौदागर बोचडे यांनी खरेदी केली. त्यामुळं हा एक नंबरचा पहिला आंबा कोल्हापूरकर नव्हे, तर सोलापूरकर चाखणार आहेत.
पावसचे सलीम काझी आणि देवगडचे उमेश तेली यांच्या बागेतला आंबा विक्रीसाठी एम.डी. बागवान यांच्याकडे विक्रीला आले होते. सहकार उपनिबंधक अरुण काकडे यांनी हापूसच्या आणखी दोन पेट्यांचाही लिलाव केला. दोन नंबर आंब्याची पाच डझनाची पेटी सात हजारांना तर त्या खालोखाल चार डझनाची पेटी साडे पाच हजारांना गेली. या दोन्ही पेट्यांचे ग्राहक कोल्हापुरातीलच आहेत.