‘लालबागचा राजा’चरणी सोन्याची पाऊले!
By admin | Published: September 19, 2016 01:43 AM2016-09-19T01:43:53+5:302016-09-19T01:43:53+5:30
‘लालबागचा राजा’चरणी अर्पण होणाऱ्या सोने, चांदी आणि अन्य वस्तूंच्या जाहीर लिलावास सोमवारी, १९ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे.
मुंबई : ‘लालबागचा राजा’चरणी अर्पण होणाऱ्या सोने, चांदी आणि अन्य वस्तूंच्या जाहीर लिलावास सोमवारी, १९ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी एका भाविकाने अर्पण केलेली १ किलो १६२ ग्रॅम वजनाची सोन्याची पाऊले, यंदाच्या लिलावातील विशेष आकर्षण असल्याची माहिती मंडळाचे खजिनदार महेश जाधव यांनी दिली. तर या सोन्याच्या पाऊलांची बाजारभावानुसार किंमत सुमारे ३६ लाख रुपये आहे, असे सुवर्णकार संजय (नाना) वेदक यांनी सांगितले.
मंडळाचे खजिनदार महेश जाधव म्हणाले की, सोमवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत लिलाव सुरू राहील. सलग तीन दिवस चालणाऱ्या लिलावात एकूण १७५ सोन्या-चांदीच्या वस्तूंची बोली लावली जाईल. गणेशोत्सवात एकूण ५,००९.५४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे, तर ७९,६०३ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने राजाच्या चरणी अर्पण झाले आहेत. जो भाविक जास्त बोली लावेल, त्याला ती वस्तू विकत घेता येईल.
दागिन्यांव्यतिरिक्त ‘राजा’च्या स्टेजजवळील आणि रांगेतील दानपेट्यांमधील रोख रक्कम मोजण्याचे काम रोजच्या-रोज सुरू होते. बँक कर्मचाऱ्यांच्या मदतीने दानपेट्यांमधील नोटा, चिल्लर आणि हारस्वरूपातील नोटा मोजण्याचे काम रविवारी सायंकाळपर्यंत सुरू होते. रविवारी मिळालेल्या माहितीनुसार, स्टेजनजीकच्या दानपेट्यांमधून २ कोटी ७८ लाख ५० हजार रुपये जमा झाले आहेत. तर रांगेतील दानपेट्यांमध्ये ३ कोटी ५३ लाख १० हजार रुपयांचे दान जमा झाले आहे. गुरुवारी विसर्जनादरम्यान ठेवलेल्या पेटीमध्ये ८ लाख ७५ हजारांचे दान मिळाल्याची माहिती मंडळाने दिली.
>काय काय मिळणार लिलावात?
‘राजा’च्या चरणी अर्पण झालेल्या सोन्याच्या पाऊलांव्यतिरिक्त सोन्याचे घर, पाळणा, उंदीर अशा विविध वस्तूंचे आकर्षण लिलावात पाहायला मिळेल. अडीच किलो वजनाचा चांदीचा कलश हे आणखी एक आकर्षण लिलावात खरेदी करता येईल. बाजारभावानुसार या कलशाची किंमत सुमारे सव्वा लाख रुपये आहे, अशी माहिती संजय (नाना) वेदक यांनी दिली. याशिवाय सोन्या-चांदीची चैन, अंगठी, मोदक, हार, बिस्किटे, नाणी अशा विविध वस्तूंचा लिलावही या वेळी करण्यात येईल.
>२ बाइक,
२ स्कूटर्सही अर्पण
‘राजा’च्या चरणी सोन्या-चांदीच्या वस्तूंव्यतिरिक्त काही भाविकांनी
२ बाइक आणि २ स्कूटर दान केल्याचे मंडळाने सांगितले. यामधील एका बाइकचा लिलाव सोमवारी, तर उरलेल्या वाहनांचा लिलाव नंतर करणार असल्याचे मंडळाने सांगितले.