मुंबईच्या राजाचे पाद्यपूजन
By admin | Published: July 10, 2017 02:37 AM2017-07-10T02:37:05+5:302017-07-10T02:37:05+5:30
लालबगाच्या गणेश गल्लीतील लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ‘मुंबईच्या राजा’चा पाद्यपूजन सोहळा रविवारी पार पडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लालबगाच्या गणेश गल्लीतील लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ‘मुंबईच्या राजा’चा पाद्यपूजन सोहळा रविवारी पार पडला. या वेळी मंडळाने विशेष आकर्षण म्हणून तामिळनाडूच्या वेल्लोर येथील श्रीपुरम अथवा महालक्ष्मी मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुवर्ण मंदिराची प्रतिकृती उभारण्याची घोषणा केली.
मंडळाचे सचिव स्वप्निल परब यांनी सांगितले की, यंदा मंडळाचे ९०वे वर्ष आहे. दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पना राबवण्यात येतात. त्यानुसार, वेल्लोर येथील सुमारे १५ हजार किलो शुद्ध सोन्यापासून उभारलेल्या सुवर्ण मंदिराची प्रतिकृती साकारली जाईल. जागेअभावी मूळ सुवर्ण मंदिराची प्रतिकृती साकारताना मंदिरातील गाभाऱ्याचा मुख्य भाग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तामिळनाडूमध्ये बांधलेले हे सुवर्ण मंदिर प्रत्यक्षात जाऊन पाहणे, भाविकांना शक्य नाही. त्यामुळे सर्वसामान्य गणेशभक्तांना मुंबईतच त्याची झलक दाखवण्याचा प्रयत्न मंडळाकडून केला जाईल.
या प्रतिकृतीसाठी सुमारे ३५ लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे मंडळाने स्पष्ट केले. बाप्पाच्या दानपेटीतून जमा होणाऱ्या वर्गणीतून हा देखावा उभा केला जाणार आहे. याशिवाय मंडळातर्फे दुष्काळग्रस्तांना मदत, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी असे विविध उपक्रम राबविले जातात.