‘किंगफिशर व्हिला’वर अखेर एसबीआयचा ताबा
By admin | Published: May 14, 2016 02:23 AM2016-05-14T02:23:25+5:302016-05-14T02:23:25+5:30
मद्यसम्राट विजय मल्ल्या यांचा कांदोळी येथे असलेला ९0 कोटींचा ‘किंगफिशर व्हिला’ ताब्यात घेण्याची प्रक्रिया शुक्रवारी
पणजी/म्हापसा : मद्यसम्राट विजय मल्ल्या यांचा कांदोळी येथे असलेला ९0 कोटींचा ‘किंगफिशर व्हिला’ ताब्यात घेण्याची प्रक्रिया शुक्रवारी उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एसबीआय (स्टेट बँक आॅफ इंडिया) विश्वस्तांनी पूर्ण केली. बँकेचे १२ अधिकारी या कारवाईत सहभागी झाले होते. त्यासाठी पोलीस बंदोबस्तही घेण्यात आला.
मल्ल्या यांनी कर्ज थकविल्याने ‘किंगफिशर व्हिला’ ताब्यात
घेण्यास उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी बँकेला परवानगी दिली
होती. हा व्हिला ताब्यात घेऊन
त्याच्या मुख्य दरवाजावर एसबीआय ट्रस्टी कंपनीचा फलकही लावण्यात आला.
मामलेदार मधू नार्वेकर या वेळी उपस्थित होते. कारवाईनंतर एसबीआयचे वकील विकास कुमार यांनी सांगितले की, किंगफिशर व्हिलाची सर्व मालमत्ता जप्त करण्यात आली असून आता त्यावर सुनावणी होईल. जिल्हाधिकाऱ्यांनी जप्तीसाठी दिलेल्या परवानगीला स्थगिती आणण्याचा प्रयत्नही मल्ल्या यांनी केला; परंतु तो अयशस्वी ठरला. या ठिकाणी एसबीआयने आपले सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत.
गोव्यात आल्यानंतर विजय मल्ल्या हे याच व्हिलामध्ये राहात होते तसेच तेथे अनेकदा हाय प्रोफाईल पार्ट्याही होत असत. मल्ल्या यांची हजारो कोटी रुपये कर्जाची थकबाकी असल्याने एसबीआयकॅप्सने या मालमत्ता जप्तीची मागणी केली होती. (प्रतिनिधी)