सचिन जोशी पुसणार किंगफिशर व्हिलाची ओळख
By admin | Published: April 19, 2017 08:14 AM2017-04-19T08:14:58+5:302017-04-19T09:31:36+5:30
गोव्यातील विजय माल्याचा आलिशान "किंगफिशर व्हिला" विकत घेणारा सचिन जोशी लवकरच या वास्तूचे नवीन नामकरण करणार आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 19 - गोव्यातील विजय माल्याचा आलिशान "किंगफिशर व्हिला" विकत घेणारा सचिन जोशी लवकरच या वास्तूचे नवीन नामकरण करणार आहे. स्वत: जोशीने हिंदुस्थान टाइम्सला ही माहिती दिली. तीनवेळा लिलावाचा प्रयत्न फसल्यानंतर तेलगू अभिनेता सचिन जोशीने स्टेट बँक ऑफ इंडियाकडून तब्बल 73.01 कोटी रुपयांना किंगफिशर व्हिला विकत घेतला.
उत्तरगोव्यात कांदोळीतील हा किंगफिशर व्हिला तीन एकरमध्ये पसरला आहे. मी किंगफिशर व्हिलाचे नाव बदलणार आहे. पण अजून कुठलेही नाव ठरवलेले नाही असे जोशीने सांगितले. सचिन जोशी सुद्धा मद्याच्या व्यवसायात असून त्याच्या विकिंग मीडिया अँड एंटरटेन्मेंट कंपनीने खासगी व्यवहारातंर्गत व्हा व्हिला खरेदी केला आहे.
काहीवर्षांपूर्वी या बंगल्यामध्ये विजय माल्याच्या पार्टया रंगायच्या. परदेशी पाहुण्यांपासून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या पाटर्यांना हजर असायचे. या व्हिलासंबंधी माहिती देताना सचिन जोशी म्हणाला की, मी तरुणपणी एकदा या बंगल्यामध्ये आलो होते. त्यावेळीच मी या बंगल्याच्या प्रेमात पडलो. आपले घर असावे तर असेच असे त्यावेळी मी मनाशी ठरवले होते. पुढे नशिबाने मला संधी मिळाली आणि आज हे घर मी विकत घेतले.
सचिन स्वत: या बंगल्यामध्ये कुटुंबियांसोबत राहण्यासाठी येणार आहे तसेच आवश्यकतेनुसार बंगल्यात बदलही करणार असल्याचे त्याने सांगितले. भारतीय बँकांचे नऊ हजार कोटी रुपये बुडवून परदेशात फरार झालेल्या विजय माल्याला काल लंडनमध्ये अटक झाली होती. मात्र काही तासातच लंडन येथील वेस्टमिंस्टर न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली.