‘किंगमेकर’ कोण ?

By admin | Published: October 31, 2015 12:29 AM2015-10-31T00:29:55+5:302015-10-31T00:33:00+5:30

महापालिका निवडणूक : अनेकांचे राजकीय भवितव्य पणाला

'Kingmaker' angle? | ‘किंगमेकर’ कोण ?

‘किंगमेकर’ कोण ?

Next

विश्वास पाटील - कोल्हापूर महापालिकेच्या सत्तेच्या सारीपाटात किंगमेकर कोण होणार, याबद्दलची लोकांत चर्चा आहे. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर व आमदार महादेवराव महाडिक यांचे राजकीय बळ ठरविणारी ही निवडणूक आहे.
महापालिकेच्या रणांगणात या पाच नेत्यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्रपणे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना व ताराराणी आघाडी रिंंगणात उतरली आहे. काँग्रेसमध्ये सतेज पाटील यांच्या जोडीला जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांचाही प्रचारात सक्रिय सहभाग राहिला; परंतु त्यांच्या विधानसभेच्या राजकारणावर महापालिका निवडणुकीचा फारसा परिणाम होत नाही. तसे सतेज पाटील यांच्याबाबतीत नाही. महापालिकेतील यशापयश हे त्यांच्या विधानसभेच्या लढतीवरही परिणाम करणारे आहे.
त्या अर्थाने विधानसभेवेळी त्यांच्यापासून दुरावलेला मतदार त्यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त करणार का, याचाही फैसला या निवडणुकीने होणार आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे किती नगरसेवक निवडून येतात व कसबा बावड्याचा गड सतेज पाटील शाबूत राखतात का, हेदेखील या निवडणुकीत तितकेच महत्त्वाचे आहे.
राष्ट्रवादीचे नेते आमदार मुश्रीफ यांच्या विधानसभेला या निवडणुकीचा काही फायदा-तोटा नाही; परंतु पक्षातील त्यांचे स्थान अधिक मजबूत करण्यासाठी हा निकाल महत्त्वाचा ठरणारा आहे. कोल्हापूर जिल्ह्णातील राष्ट्रवादीचे वर्तमान आणि भवितव्यही मुश्रीफच राहतील का, याचा निर्णय देणारी ही निवडणूक आहे. खासदार धनंजय महाडिक या निवडणुकीत पक्षापासून थेट बाजूला गेल्यामुळे पुढच्या लोकसभेवेळी ते राष्ट्रवादीचेच उमेदवार असतील का, याबद्दलही राष्ट्रवादीतच साशंकता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे या निवडणुकीतील जे काही यश असेल ते एकट्या मुश्रीफ यांच्याच प्रयत्नांचे असेल.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिष्ठा तर सगळ्यात जास्त पणाला लागली आहे; कारण भाजपची शहरात फारशी चांगली संघटनात्मक बांधणी झाली नसताना तीन जागांवरून त्यांना तीस जागांपर्यंत झेप घ्यायची आहे. भाजपला ज्या जागा मिळतील, त्याचे पक्षाच्या राज्याच्या राजकारणावरही पडसाद उमटणार आहेत. पुढील वर्षी मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. कोल्हापुरात भाजप व
शिवसेनेत जी झोंबाझोंबी झाली, त्याचा परिणाम तेथील निवडणुकीवरही होणार आहे. त्यात मुख्यमंत्र्यांनी दादांना ‘काही झाले तरी शिवसेनेपेक्षा किमान एक तरी जागा जास्त आली पाहिजे,’ असे बजावले असल्याने चंद्रकांतदादा यांचाही चांगलाच कस लागणार आहे. दादा त्यांच्या आजपर्यंतच्या राजकीय प्रवासात प्रथमच कोल्हापूरच्या गल्ली-बोळांतून पळताना दिसले.
आमदार महाडिक हे आपला ताराराणी आघाडीशी काही संबंध नाही, असे वारंवार सांगत असले तरी ‘ताराराणी’चे यशापयश हे अमल किंवा स्वरूप यांच्यापेक्षा ते महादेवराव महाडिक यांच्या राजकीय कर्तृत्वाची फूटपट्टी म्हणूनच पाहिले जाणार आहे. म्हणून तर सगळ्या प्रचारात त्यांच्या विरोधातील सर्वच पक्षांनी अमल, स्वरूप किंवा धनंजय महाडिक यांच्यावर फारशी टीकाच केली नाही.
जी काही टीका झाली ती पूर्णत: महादेवराव महाडिक यांच्यावरच. त्याशिवाय ‘ताराराणी’चे नाणे किती चालते यावर महादेवराव महाडिक यांच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीचे भवितव्यही ठरणार आहे. अगोदरच त्यांनी काँग्रेसला अंगावर घेतले. या निवडणुकीत भाजपला मित्र केले; परंतु राष्ट्रवादी व मुश्रीफ त्यांचे शत्रू झाले. त्यामुळे एवढे होऊनही त्यांना चांगले यश मिळाल्यास त्यांचे राजकीय वजन आणखी वाढणार आहे.
पालकमंत्री पाटील यांच्या इतकीच शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्याही राजकीय भवितव्यावर परिणाम करणारी ही निवडणूक आहे. या निवडणुकीत त्यांनी सगळ्यांना बरोबर घेऊन एकट्यानेच किल्ला लढविला. त्यामुळे शिवसेनेला जे काही यश मिळेल त्यावरून क्षीरसागर यांचा शहराच्या राजकारणावर किती प्रभाव आहे, याचा मेळ घातला जाईल. या निवडणुकीने त्यांचे भाजपबरोबरचे शत्रुत्व आणखी वाढले. त्याचेही परिणाम कोल्हापूर ‘उत्तर’च्या राजकारणावर होणार आहेत.

Web Title: 'Kingmaker' angle?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.