"माझा मनसुख हिरेन करण्याचा प्रयत्न, मोदीजी आणि देवाच्या कृपेनं बचावलो"; किरीट सोमय्यांकडून जोरदार हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 10:39 AM2022-04-24T10:39:06+5:302022-04-24T10:47:01+5:30
ठाकरे सरकार हे तर उद्धट ठाकरे सरकार असून माझा मनसुख हिरेन करण्याचा प्रयत्न या सरकारच्या प्रतिनिधींकडून केला जात आहे.
मुंबई-
ठाकरे सरकार हे तर 'उद्धट' ठाकरे सरकार असून माझा मनसुख हिरेन करण्याचा प्रयत्न या सरकारच्या प्रतिनिधींकडून केला जात आहे. पण मोदीजी आणि देवाच्या कृपेमुळे मी काल बचावलो, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. काल रात्री खार पोलीस ठाण्याबाहेर शिवसैनिकांकडून सोमय्या यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोमय्यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात सोमय्या जखमी देखील झाले होते. त्यानंतर त्याच अवस्थेत सोमय्यांनी वांद्रे पोलीस ठाणे गाठले होते. कालचा संपूर्ण प्रकरणानंतर किरीट सोमय्या यांनी आज मुलुंडमधील भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेत संपूर्ण घटनेची माहिती दिली.
किरीट सोमय्या यांनी यावेळी ठाकरे सरकारवर थेट टीका करत कालचा प्रकार म्हणजे पोलिसांच्या संगनमताने माझी हत्या करण्याचा कटच असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. "माझा मनसुख हिरेन करण्याचा कट ठाकरे सरकारचा आहे. आतापर्यंत मला तीन वेळा मारण्याचा प्रयत्न झाला आहे. पण जनता माझ्यासोबत आहे. राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही जीवंत आहे. त्यामुळे माझ्या केसाला सुद्धा धक्का लागू शकत नाही. उद्धट ठाकरे सरकारच्या नेत्यांना आम्ही पाहून घेऊ. मला मारणारा या हिंदुस्तानात जन्माला आलेला नाही", असा घणाघात किरीट सोमय्या यांनी केला आहे.
केंद्रीय गृहसचिवांची भेट घेणार
खार पोलीस ठाण्याबाहेर घडलेल्या घटनेच्याबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा केंद्रीय गृहसचिवांशी बोलणार असून याबाबत त्यांची भेट घेणार असल्याचंही किरीट सोमय्या यांनी सांगितलं. राज्यात भाजपा नेत्यांविरोधात घडत असलेल्या घटनांची माहिती गृह सचिवांना देऊन याबाबत योग्य कारवाई करण्याची मागणी केली जाणार असल्याचं सोमय्या म्हणाले.
मी येणार याची माहिती आधीच दिली गेली
"राणा दाम्पत्याला मी भेटायला येणार असल्याची माहिती आधीच तिथं दिली गेली होती. त्यामुळेच इतके गुंड तिथं जमा झाले होते. पोलिसांच्या संगनमतानंच सारं घडलं आहे. कारण मी तिथून सुरक्षित बाहेर पडण्याची जबाबदारी पोलिसांनी घेतली होती. त्यांनी मला आश्वस्त केल्यानंतरच मी तिथून निघालो होतो. पण गेटबाहेर येताच माझ्या गाडीवर माफिया सेनेचे गुंड तुटून पडले. चपला, काचेच्या बाटल्या, दगडफेक करण्यात आली. यावर पोलिसांनी काहीच केलं नाही. माझ्यासोबत असलेल्या कमांडोमुळेच मी सुखरुप बाहेर पडू शकलो. त्यांनाही मारहाण करण्यात आली आहे", असं किरीट सोमय्या म्हणाले.