दारू वाहतुकीसाठी किरीट सोमय्या अटकेत
By admin | Published: March 24, 2017 01:55 AM2017-03-24T01:55:12+5:302017-03-24T01:55:29+5:30
एका मोटारीमधून गावठी दारूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या किरीट रामजीभाई सोमय्या (६०) याला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोंबिवली पथकाने अटक
ठाणे : एका मोटारीमधून गावठी दारूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या किरीट रामजीभाई सोमय्या (६०) याला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोंबिवली पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून कारसह ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
देसाई गावातून ठाण्याकडे एका कारमधून गावठी दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागला मिळाली होती. हेदुटणे-शिरढोण रस्त्यावरून जात असताना या मोटारीला २१ मार्चच्या रात्री पथकाने पकडले. किरीटसह ३० हजारांची दारू जप्त केली. ती कोणाकडून आणली, कुठे नेली जाणार होती, याची चौकशी उत्पादन शुल्क विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
नामसाधर्म्यामुळे गोंधळ-
गावठी दारूची चोरटी वाहतूक करताना किरीट सोमय्या (रा. अगरवालनगर, मुंबई) याला पकडल्याचे वृत्त पसरताच सुरुवातीला सर्वत्र एकच खळबळ उडाली. पण, ज्यांना पकडले, ते प्रसिद्ध नेते नसून वेगळे सोमय्या आहेत, हे समजताच गोंधळ दूर झाला.