Kirit Somaiya: ठोकशाहीला ठोकशाहीने उत्तर, पोलिसांवर कारवाई करा; देवेंद्र फडणवीस, आशिष शेलारांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 11:57 PM2022-04-23T23:57:42+5:302022-04-23T23:58:54+5:30
Shiv Sainiks attack Kirit Somaiya: सोमय्या यांच्या गाडीवर चप्पल, बाटल्या फेकत घोषणाबाजी केली आहे. यामध्ये किरीट सोमय्यांच्या तोंडाला दुखापत झाली असून त्यांच्या हनुवटीवरून रक्त येत होते.
किरीट सोमय्या हे झेड सुरक्षा असलेले आहेत, त्यांनी पोलीस स्टेशनला येणार असल्याचे कळविले होते. आतमध्ये गेल्यावर त्यांनी आपल्यावर हल्ला होणार आहे, बाहेरील गर्दी हटवा असे सांगितले होते. तरीही पोलिसांनी बाहेरील गुंडांना हटविले नाही आणि पोलिसांच्या समोरच सोमय्या यांच्यावर हल्ला झाला. हे स्वीकार करता येणारे नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मी उद्या केंद्राला आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. त्यात या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करणार आहे. आम्हीही जशास तसे उत्तर देऊ शकतो. एका बाईने यांना जेरीस आणले आहे. तिच्या विरोधासाठी हजाराच्या संख्येने कार्यकर्ते बोलावले होते, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
लोकशाहीला लोकशाहीने उत्तर देऊ, ठोकशाहीला ठोकशाहीने उत्तर देऊ. एखादा नेता एकटा गाडीतून जात असताना त्याच्यावर हल्ला केला जातो. उद्या त्यांचेही नेते कार्यकर्ते फिरतील. अशाप्रकारे सरकार चालविले जात नाही. सोमय्या त्या पोलीस ठाण्यात जाणार होते, म्हणजे तिथे १४४ कलम लागू होते. मग एवढे लोक जमले कसे? असा सवाल आशिष शेलार यांनी केला. तसेच हा प्रकार शिवसेनेला महागात पडेल असे ते म्हणाले. एखाद्या झेड सुरक्षा असलेल्या नेत्याने, माजी खासदाराने कोणत्याही पोलीस ठाण्यात जाणे हा गुन्हा ठरत नाही. जर ते जाऊ शकले नाहीत तर सामान्य माणूस कसा जाईल, मी सोमय्यांची समजूत काढलेली आहे, पोलिसांना एफआयआर दाखल करण्यास सांगितला आहे, असे आशिष शेलार म्हणाले.