“नजरकैदेत ठेवायला किरीट सोमय्या दहशतवादी, बलात्कारी की दरोडेखोर’’, चंद्रकांत पाटील यांचा संतप्त सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 06:01 PM2021-09-19T18:01:39+5:302021-09-19T18:03:35+5:30
Chandrakant Patil, Kirit Somaiya News: मुंबईत किरीट सोमय्या यांच्या निवासस्थानी शेकडो पोलिसांना बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपाकडून या कारवाईविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
कोल्हापूर - भाजपाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांना कोल्हापूरमध्ये येण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केली आहे. तसेच मुंबईतही किरीट सोमय्या यांच्या निवासस्थानी शेकडो पोलिसांना बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपाकडून या कारवाईविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही राज्य सरकारने किरीट सोमय्यांविरोधात केलेल्या कारवाईविरोधात संताप व्यक्त केला आहे. नजरकैदेत ठेवायला किरीट सोमय्या दहशतवादी आहेत, बलात्कारी आहेत की दरोडेखोर, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. ("Kirit Somaiya is a terrorist, rapist or robber to be kept in Incarceration", angry question of Chandrakant Patil)
चंद्रकांत पाटील म्हणाले की, माजी खारदार किरीट सोमय्या यांच्या घराच्या बाहेर १०० पोलिसांनी गराडा घातला आहे. किरीट सोमय्या दहशतवादी आहेत, बलात्कारी आहेत की दरोडेखोर. दहशतवादी उजळ माथ्याने फिरताहेत. मुंबईमध्ये घातपात करण्यासाठी, बॉम्बस्फोट करण्यासाठी, गॅसच्या माध्यमातून स्फोट घडवण्यासाठी मुंबईमध्ये दहशतवादी काम करताहेत. त्यातले काही जण पकडले जाताहेत. काही जण पकडले जात नाहीयेत. आणि इकडे किरीट सोमय्या भ्रष्टाचारी मंत्र्यांची प्रकरणे काढत असताना त्यांना कोल्हापूरला येण्यास मनाई करण्यात आली आहे. तुम्हाला रेल्वे स्टेशनवरून परत पाठवू, सर्किट हाऊसमध्ये डिटेन करू, असे सांगितले जात आहे. म्हणजे येथील लोकशाही संपलीय. जे बोलायचे ते बोलायचे नाही. कशाच्या आधारे तुम्ही त्यांना डिटेन करणार आहात. ही दंडुकेशाही चालणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
किरीट सोमय्या यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत जे काही मांडलंय ते पुरेसं आहे. त्यांच्याकडे अजून काही विषय आहेत. ते मांडण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी ते येणार आहे. मात्र तुम्ही त्यांना थांबवल्याने काही फरक पडत नाही. एका अर्थाने एकेकाळी बिहारमध्ये जी परिस्थिती होती. दंडुकेशाही, गुंडगिरी, दडपशाही, लोकशाहीचा खून, ते तिथे निट झालं. आता ते महाराष्ट्रात तुम्हाला निर्माण करायचं आहे का? भाजपा याला घाबरत नाही. किरीट सोमय्या तर घाबरतच नाहीत. तसेच भाजपाही त्यांच्या पूर्णपणे पाठीशी आहे. तसेच हा विषय अखेरपर्यंत जाईल, असं आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिलं.