'किरीट सोमय्यांनी धमकावलं, भाजपाने अन्वय नाईक यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं', संजय राऊत यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 10:47 AM2022-02-18T10:47:40+5:302022-02-18T10:48:17+5:30
Anvay Naik Suicide Case: संजय राऊत हे किरीट सोमैय्या आणि भाजपाविरोधात कमालीचे आक्रमक झाले असून, त्यांनी अन्वय नाईक यांच्या आत्महत्येवरून भाजपाविरोधात गंभीर आरोप केले आहेत. अन्वय नाईक यांना भाजपाने आत्महत्येसाठी भाग पाडले, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. दरम्यान, संजय राऊत हे किरीट सोमैय्या आणि भाजपाविरोधात कमालीचे आक्रमक झाले असून, त्यांनी अन्वय नाईक यांच्या आत्महत्येवरून भाजपाविरोधात गंभीर आरोप केले आहेत. अन्वय नाईक यांना भाजपाने आत्महत्येसाठी भाग पाडले. तसेच या प्रकरणात आरोप झालेल्या अर्णब गोस्वामींकडे पैसे मागू नये, तसेच त्यांना बिल पाठवू नये, यासाठी किरीट सोमय्यांनी अन्वय नाईक यांना दमबाजी केली होती, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
याबाबत संजय राऊत म्हणाले की,अन्वय नाईक यांना आत्महत्या का करावी लागली, यावर हे लोक बोलत नाही, त्यांनी यावर बोलंल पाहिजे. अन्वय नाईक यांना ज्याच्यामुळे आत्महत्या करावी लागली, त्याच्या समर्थनार्थ हे सगळे लोक कोर्टबाजी, पत्रकबाजी करत होते. एक मराठी माणूस मराठी उद्योजक अन्वय नाईक यांनी भारतीय जनता पक्षाच्या दबावामुळे आत्महत्या केली. कारण अर्णव गोस्वामीला हे लोक वाचवत होते, असा आरोप राऊत यांनी केला.
या प्रकरणावरून संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवरही आरोप केले, ते म्हणाले की, या किरीट सोमय्या यांनीसुद्धा त्याच्या आधी काही वेळा अन्वय नाईक यांना धमक्या दिल्या होत्या. अर्णव गोस्वामी यांच्याकडे पैसे मागायचे नाही, बिल पाठवायचे नाही, अशी दमबाजी केली होती. किरीट सोमय्या यांनी दोन वेळा अन्वय नाईक यांना धमकी दिली होती. भाजपाने अन्वय नाईक यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केले होते. हे अन्वय नाईक यांचे हत्यारे आहेत. त्यातील एक हत्यारा आज त्याच जमिनीवर जात आहे. भाजपावाले महाराष्ट्र आणि मुंबईतून मराठी लोकांना संपवू इच्छित आहे, असा आरोप संजय राऊन यांनी केला.
दरम्यान, आज प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली. ते म्हणाले की, एक वेडा माणूस इकडे तिकडे फिरतोय. मी सांगितल्याप्रमाणे ते तुरुंगात जातील. किरीट सोमय्या तुरुंगात जाण्याचा रस्ता शोधत आहेत, मी त्यांच्यावर जास्त बोलणार नाही.
महाराष्ट्रातील जनता त्यांची धिंड काढणार आहे. कुठे बंगले आहेत ते दाखवा, ते बंगले अदृश्य झालेत काय. मी आधीच सांगितलंय की, त्या जमिनीवर एकही बंगला नाही, एकही बांधकाम नाही. याबाबत वारंवास स्पष्टीकरण झालेलं आहे. त्यांना स्वप्नामध्ये बंगले दिसतात. मला वाटतं भाजपाला भूताटकीनं झपाटलं आहे. त्यांना स्वप्नात स्वत:च्याच बेनामी प्रॉपर्टी दिसत आहेत, असा टोलाही राऊत यांनी लगावला.