"माझी हत्या करण्याचा कट, घातपात होणार हे पोलिसांनीच सांगितलं", किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 09:26 PM2022-03-26T21:26:39+5:302022-03-26T21:28:47+5:30
दापोली तालुक्यातील प्रसिद्ध अशा मुरूड बीचवर असणा-या साई रिसॉर्ट तोडण्यासाठी आलेल्या किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केला आहे.
दापोली:
दापोली तालुक्यातील प्रसिद्ध अशा मुरूड बीचवर असणा-या साई रिसॉर्ट तोडण्यासाठी आलेल्या किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. माजी खासदार निलेश राणे व हजारों कार्यकर्त्यासोबत दापोलीत आलेल्या माजी खासदार किरीट सोमय्या यांना पोलिसांनी दापोली बसस्थानकासमोर नाक्यावरच अडवले. किरीट सोमय्या खेडहून दापोली येथील साई रिसॉर्टकडे निघाले होते. कुठल्याही प्रकारचा अनर्थ होऊ नये म्हणून पोलीसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी किरीट सोमय्या यांचे जंगी स्वागत केले. एका बाजूला किरीट सोमय्या यांना भाजपच्या कार्यकर्त्यांचे समर्थन व दुस-या बाजूने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, हॉटेल व्यवसायिक यांचे निषेध आंदोलन सुरू होते.त्यामुळे दापोलीतील वातावरण चांगलेच तापले होते.
रत्नागिरीचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री अनिल परब यांचे साई रिसॉर्ट हे बेकायदेशीर आहे. अशी बेकायदेशीर बांधकाम शासननियमानूसार तोडावीच लागतात.तसा शासनाचा नियमच आहे. बेकायदेशीर असणारे साई रिसॉर्ट तोडण्यात यावे, म्हणून महाराष्ट्र सरकारकडे मी अनेकदा तक्रारी केल्या, मात्र महाराष्ट्र सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. म्हणून नालाईजाने बेकायदेशीर साई रिसॉर्ट तोडण्यासाठी मला दापोलीत यावे लागले. मी दापोलीत आल्यानंतर पोलिसांनी मला मुरूड येथे जाऊ दिले नाही, मला नाक्यावरच अडवून पोलीस ठाण्यात 1 तास ताडकडत बसवून ठेवले. येथील पोलीस निरीक्षक व पोलीस अधिक्षक हे पालकमंत्र्यांचा दबाबाखाली काम करत आहेत. मी मुरूडला गेलो तर माझी हत्या होऊ शकते, माझा घातपात होऊ शकतो, अशी माहिती मला पोलीसच देत आहेत. मला पोलीसच घाबरवत आहेत, पोलीस कुणाच्यातरी दबावात येऊन मला अडवत आहेत, मला घाबरवत आहेत. जोपर्यंत मंत्री अनिल परब यांच्या वर गून्हा नोंदवला जात नाही तोपर्यंत मी पोलीस ठाण्यातून हलणार नाही, अशी ठाम भूमिका किरीट सोमय्या यांनी घेतली आहे.