किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढणार? अनिल परबांकडून हक्कभंगाचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 07:28 PM2023-03-10T19:28:19+5:302023-03-10T19:28:51+5:30
Anil Parab : किरीट सोमय्यांनी माझ्यावर खोटे आरोप करत माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे देखील अनिल परब यांनी सांगितले.
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी आज विधान परिषदेत आज किरीट सोमय्या यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला.
अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांच्यासह म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद बोर्डीकर यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला आहे. तसेच, किरीट सोमय्यांनी माझ्यावर खोटे आरोप करत माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे देखील अनिल परब यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात घडणाऱ्या घडामोडींकडे पाहणे जास्त महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, अनिल परब यांनी म्हाडाची जमीन हडपल्याचा आरोप किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला होता. याप्रकरणी आपली नाहक बदनामी झाल्याचे सांगत अनिल परब यांनी विधान परिषदेत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. आपला हक्कभंगाचा प्रस्ताव विधिमंडळाच्या विशेष हक्क समितीकडे पाठवावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. त्यामुळे विशेष हक्क समिती आता या प्रकरणात चौकशी करुन काय निर्णय घेते, ते पाहावं लागणार आहे.
अनिल परब नेमकं काय म्हणाले?
"महाराष्ट्र विधान परिषद नियम २४१ अन्वये मी विशेष हक्कभंगाची सूचना देतोय. मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद भूरीकर आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात हक्कभंगाची सूचना देत आहे. संबंधित प्रकरण आपण पुढील चौकशी आणि कारवाईसाठी विशेष हक्क समितीकडे पाठवावे, अशी विनंती करतो", असे अनिल परब म्हणाले.
यावर स्पष्टीकरण देताना अनिल परब यांनी सांगितले की, मुंबई गृहनिर्माण मंडळाच्या ज्या जुन्या वसाहती आहेत, त्यात मोकळी जागा असते. एकूण ५६ वसाहती मुंबईत आहेत. या वसाहतीत अशी कोणतीही जागा नाही की जिकडे २२० स्केअर फुटमध्ये राहणाऱ्या माणसाने आपल्या घराचा वरंडा वाढवला नाही. त्या सोसायटीने तिथे एक शेड बांधला होता. २००४ मध्ये जेव्हा मी लोकप्रतिनिधी झालो. मी तिथे राहत असल्यामुळे तिथल्या लोकांनी मला तिथे बसून काम करण्यास परवानगी दिली, सोसायटीने परवानगी दिल्यानंतर त्या शेडमध्ये बसून मी आमदार म्हणून काम करत होतो.
याचबरोबर, "५६ वसाहतीत अशा प्रकारे वरंड्याची जागा वाढवली आहे. तरीही माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हाडा भूखंड हडपला असा खोटा आरोप केला. म्हाडाने केलेल्या खुलाशानंतर हे बांधकाम माझं नाही, हे स्पष्ट झालं. म्हाडाने मला दिलेली नोटीस मागे घेतली. त्यामुळे एका लोकप्रतिनिधीची वारंवार बदनामी करणं आणि खोटे आरोप करणं यावर आळा बसला पाहिजे", असे अनिल परब म्हणाले.