किरीट सोमय्यांचे ठाकरे पिता-पुत्रांवर पुन्हा गंभीर आरोप, संजय राऊतांवरही साधला निशाणा, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 02:40 PM2022-02-09T14:40:20+5:302022-02-09T14:41:35+5:30
Kirit Somaiya News: पुण्यात किरीट सोमय्यांना झालेली मारहाण, त्यानंतर तिचे शिवसेनेकडून झालेलं समर्थन आणि आज संजय राऊत यांनी भाजपावर केलेले गंभीर आरोप, यानंतर आता आज पुन्हा एकदा किरिट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर गंभीर टीका केली.
मुंबई - शिवसेना आणि भाजपा यांच्यातील वाद पुन्हा एकदा विकोपाला जाण्याची चिन्हे आहेत. पुण्यात किरीट सोमय्यांना झालेली मारहाण, त्यानंतर तिचे शिवसेनेकडून झालेलं समर्थन आणि आज संजय राऊत यांनी भाजपावर केलेले गंभीर आरोप, यानंतर आता आज पुन्हा एकदा किरिट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर गंभीर टीका केली. तसेच भाजपावर गंभीर आरोप करणाऱ्या संजय राऊत यांच्यावरही सोमय्या यांनी निशाणा साधला.
किरीट सोमय्या म्हणाले की, कोरोनाकाळात कोरोनाबाधित रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचे काम आदित्य आणि उद्धव ठाकरे यांनी केले. वडील उद्धव ठाकरे आदेश देतात की त्या संबंधित कंपनीला काम देऊ नका, पण त्यांचेच पुत्र आदित्य ठाकरे त्या कंपनीला काम देतात. पैशासाठी तुम्ही मुंबई आणि पुणेकरांचा जीव धोक्यात घातला होता. ५८ कोटी रुपयांचे कंत्राट सुजित पाटकर यांना मुंबई महापालिका आयुक्त चहल यांनी दिले. हा सुजित पाटकर संजय राऊत याचा पार्टनर आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.
यावेळी किरीट सोमय्यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली, ते म्हणाले की, संजय राउत यांनी जे घोटाळे केले त्याचे एकही उत्तर देण्यासाठी तयार नाहीत, एका किरीट सोमय्या याची हत्या झाली तर 100 किरीट सोमया तयार होतील. संजय राऊत हे मोठ्या हिमतीने सांगत आहेत की, लालू प्रसाद यादवांना भ्रष्टाचारप्रकरणी तुरुंगामध्ये टाकले आहे. त्यामुळे त्यांनाही तुरुंगामध्ये जावं लागतंय की काय, असं राऊतांना वाटतंय, असा टोला किरीट सोमय्या यांनी लगावला.
तसेच किरीट सोमय्या हे नशेत आरोप करत असतात, अशा संजय राऊत यांनी केलेल्या टिकेलाही सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, मी आयुष्यात कधी विडी, सिगारेट बिअरही प्यायलो नाही. अंडही खाल्लं नाही. माझ्यात नशा आहे ठाकरे सरकारच्या ठोकशाहीला ठोकण्याची. माझ्यात नशा आहे उद्धव ठाकरेंच्या माफियागिरीला संपवण्याची माझ्यात नशा आहे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेला लुटणाऱ्या आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्याकडून पैसे आणण्याची, असे किरीट सोमय्या म्हणाले.