Kirit Somaiyya: 'संजय राऊतांच्या कुटुंबाची वाईन कंपनीसोबत पार्टनरशिप'; किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 12:50 PM2022-01-30T12:50:06+5:302022-01-30T12:50:12+5:30
Kirit Somaiyya: 'विधिता आणि पूर्वशी या संजय राऊत यांच्या दोन्ही मुली कंपनीत संचालक आहेत.'
मुंबई: महाराष्ट्रात सध्या किराणा दुकानात वाईन(Wine) च्या विक्रीवरुन सुरू झालेले प्रकरण चांगलेच तापले आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यातच आता भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiyya) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला आहे.
'राऊतांची वाईन व्यावसायिकांसोबत भागीदारी'
मीडियाशी संवाद साधताना सोमय्या यांनी संजय राऊतांच्या कुटुंबियांची वाईन व्यावसायिकांबरोबर भागीदारी असल्याचे म्हटले आहे. 'संजय राऊतांच्या कुटुंबाने काही महिन्यांपूर्वी एका वाईन व्यावसायिकासोबत व्यावसायिक भागीदारी केली आहे. त्यांनी जाहीर करावं की त्यांची पत्नी, त्यांची कन्या यांच्या नावावर किती पार्टनरशीप आहे,' असं सोमय्या म्हणाले.
'राऊतांच्या मुली कंपनीच्या संचालिका'
'अशोक गर्ग यांच्या मॅगपी ग्लोबल लिमिटेड कंपनीसोबत राऊत यांची पार्टनरशीप आहे. त्यांचा हॉटेल, पब, क्लबस आणि काही ठिकाणी वाईन वितरित करण्याचा व्यवसाय आहे. 16 एप्रिल 2021 रोजी राऊत कुटुंबियांनी मॅगपीसोबत करार केला आहे. विधिता आणि पूर्वशी या संजय राऊत यांच्या दोन्ही मुली या कंपनीत संचालक आहेत,'असा दावा सोमय्या यांनी केला आहे.
'आरोपांना कुणीच उत्तर देत नाही'
'मॅगपी कंपनीची वार्षिक उलाढाल 100 कोटींच्या घरात आहे. कंपनीने 2 जानेवारी रोजी या कंपनीचा मुख्य व्यवसाय वाईन वितरित करण्याचा असल्याचे शासनाला सांगिले आहे. त्यानंतर राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वईन विकण्यास परवानगी दिली. मी थेट आरोप करतोय, पण उत्तर कोणी देत नाही', असंही किरीट सोमय्या म्हणाले.