प्रेमाने ‘किसन’ अशी हाक मारणारे कमी झाले, पण दाराबाहेर चपला हीच श्रीमंती!

By पंकज पाटील | Updated: April 20, 2025 13:11 IST2025-04-20T13:08:17+5:302025-04-20T13:11:00+5:30

किसन ते आमदार किसन कथोरे हा यशाचा प्रवास असला तरी आपुलकीने ‘किसन’ म्हणून हाक मारणाऱ्या माणसांची संख्या कालौघात कमी झाल्यामुळे खंत वाटते.

kisan kathore : There have been fewer people calling themselves 'Kisan' out of love! | प्रेमाने ‘किसन’ अशी हाक मारणारे कमी झाले, पण दाराबाहेर चपला हीच श्रीमंती!

प्रेमाने ‘किसन’ अशी हाक मारणारे कमी झाले, पण दाराबाहेर चपला हीच श्रीमंती!

- किसन कथोरे, आमदार
बदलापूर गावातील शिकलेल्या तरुणाला सरपंच करण्याचा हट्ट संपूर्ण गावाने केला आणि गावाच्या एकोप्यामुळे बिनविरोध सरपंच होण्याचा मान सलग तीन वेळा मिळाला. यादरम्यान जो मित्रपरिवार तयार झाला तो आपल्याला हक्काने ‘आपला किसन’ म्हणून हाक मारत होता. किसन ते आमदार किसन कथोरे हा यशाचा प्रवास असला तरी आपुलकीने ‘किसन’ म्हणून हाक मारणाऱ्या माणसांची संख्या कालौघात कमी झाल्यामुळे खंत वाटते.

बारवी धरणाच्या प्रकल्पात गाव आणि जमीन गेल्यामुळे गाव स्थलांतरित करावे लागले. प्रकल्पग्रस्त म्हणून ज्या ठिकाणी गाव स्थलांतरित करण्यात आले त्या ठिकाणाहून शिक्षण घेणे अवघड होते. आठ ते नऊ किलोमीटरचा पायी प्रवास करून शाळेपर्यंत पोहोचण्याचा संघर्ष आजही आठवतो. 

कोणतीही साधने नसताना त्या अवघड परिस्थितीत अकरावीपर्यंतचे शिक्षण आई-वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी केले. शालेय शिक्षण पूर्ण करण्यासाठी केवळ आई-वडीलच नाही तर एकत्रित कुटुंबात राहणाऱ्या प्रत्येकाने सहकार्य केले. 

गावासाठी काहीतरी करावं ही मनात जिद्द असल्यामुळेच मला पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले. त्यानंतर सरपंच, सरपंच संघटनेचे अध्यक्षपद, पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती सभापतिपद, त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा परिषद अध्यक्ष असा अखंड प्रवास सुरू राहिला. त्यानंतर सलग पाचवेळा आमदार होण्याचा मान मिळाला. 

या प्रवासादरम्यान नातेवाइकांच्या ओळखीतील कमल (नानी) हिच्याशी विवाह झाला. अत्यंत धार्मिक कुटुंबातून आलेल्या पत्नीमुळे मीदेखील विकासकामांना श्रद्धेचे स्वरूप दिले. व्यक्ती म्हणून नव्हे तर विकासकामांमुळे आपली ओळख निर्माण व्हावी ही पत्नींची इच्छा सार्थकी लागली. सामाजिक आणि राजकीय काम करत असताना कुटुंबाची सर्व जबाबदारी पत्नीने चोख निभावली.

कुटुंबासाठी वेळ काढण्याची सवय 

कुटुंबासाठी वेळ काढावा लागतो. मी अशा क्षेत्रात काम करीत आहे जेथे मला माझ्याच कुटुंबासाठी वेळ देता येत नाही. मात्र आता वेळ मिळत नसला तरी कुटुंबासाठी वेळ काढण्याची सवय लावून घेतली आहे.

दाराबाहेर चपला हीच श्रीमंती

सकाळ आणि संध्याकाळ सर्वसामान्य नागरिकांना आवर्जून वेळ देण्याची सवय पूर्वीपासूनच होती. सकाळी समस्या मांडण्यासाठी येणाऱ्यांची संख्या कधीही घटली नाही. 

मी स्वतःची श्रीमंती मोजत असताना आपल्या दाराबाहेर किती लोकांच्या चपला आहेत त्यावरूनच आपल्या श्रीमंतीचा अंदाज लावत आलो. तो अंदाज आजपर्यंत कमी झालेला नाही. 

माझ्याकडे कामानिमित्त येणाऱ्या व्यक्तीचे काम मार्गी लागेपर्यंत पाठपुरावा करतो. लोकांचे काम करणे आणि मतदारसंघात विकासकामांकरिता निधी उपलब्ध करून देणे हेच जणू माझे व्यसन आहे.

आर्थिक लोभ वाढला

राजकारणातील अनेक चढउतार पाहिले. राजकारण कसे बदलत गेले हेही पाहिले. हल्ली राजकारण चुकीच्या दिशेने जात आहे. सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्याकरिता पूर्वी लोक राजकारणात येत होते. 

आता आर्थिक लोभाचे राजकारण झाले आहे. दोन्ही पर्व मी पाहिली आहेत. जात आणि धर्मामध्ये राजकारण गुंतले आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. मी चोवीस तास राजकारणाचा विचार करतो.

मित्रांसह भटकंती

कुठेही फिरण्यासाठी मी माझ्या मित्रपरिवाराला सोबत घेतो. मित्रांचे कुटुंब एकत्रित करून आवर्जून वर्षातून दोनवेळा तरी फिरायला जाण्याचा प्रयत्न करतो. 
शब्दांकन : पंकज पाटील
 

Web Title: kisan kathore : There have been fewer people calling themselves 'Kisan' out of love!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.