Kisan Long March- शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही कटिबद्ध, सकारात्मक तोडगा काढू, महसूल मंत्री व कृषी राज्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2018 10:11 AM2018-03-12T10:11:44+5:302018-03-12T10:11:44+5:30
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत, शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी मी तयार असल्याची प्रतिक्रिया कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.
मुंबई- विविध मागण्यांसाठी 200 किलोमीटरची पायपीट केलेला बळीराजा अखेर आझाद मैदानावर धडकला आहे. विविध मागण्यांसाठी नाशिकहून मुंबईकडे पायी निघालेला किसान सभेचा मोर्चा आज पहाटे आझाद मैदानात दाखल झाला.आज दुपारी आझाद मैदानावर शेतकऱ्यांची जाहीर सभा होणार आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत, शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी मी तयार असल्याची प्रतिक्रिया कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. तर दुसरीकडे, हे सरकार शेतकऱ्यांचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढू असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हंटलं आहे.
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मोर्चेक-यांना सामोरे जात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा घडवून आणण्याचं आश्वासन दिलं. मात्र, सरकारच्या लेखी आश्वासनावर मोर्चेकरी ठाम असून, मागण्या मान्य होईपर्यंत मुंबई सोडणार नाही, असा निर्धार त्यांनी केला आहे. या मोर्चात 30 हजारांहून अधिक शेतकरी सहभागी झाले आहेत.
किसान सभेचं शिष्टमंडळ आणि सरकारमधल्या बैठकीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. बैठक दुपारी 2 वाजता होणार असून दुपारी 11 वाजता विधिमंडळात कै. पतंगराव कदम यांचा शोक प्रस्ताव आणि 12 वाजता राज्यसभेचे उमेदवारी अर्ज भरणार असल्याने दोन तासांनी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.
आज आझाद मैदानात मोर्चेकऱ्याची भव्य सभा होणार आहे. किसान सभेचे आणि कम्युनिस्ट पार्टीचे राष्ट्रीय नेते सभेत सहभागी होणार आहेत. आज संध्याकाळी कम्युनिस्ट पार्टीचे नेते खासदार सीताराम येचुरी सभेला संबोधित करणार आहेत.