“१०दा प्रयत्न पण उद्धव ठाकरे भेट नाही, आदित्य-वरुण सरदेसाईंसाठी हिंदुत्व भूमिका सोडायला...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 13:48 IST2025-02-22T13:45:58+5:302025-02-22T13:48:27+5:30
Thackeray Group News: कोणाच्या जाण्याने काही फरक पडत नाही, ही भूमिका आत्मघाती आहे. संजय राऊत फक्त स्वतःचे विचार मांडतात, पक्षाचे नाही. संजय राऊतांनी स्वबळाची भूमिका मांडली आणि पक्षाला गळती लागली, अशी टीका करण्यात आली आहे.

“१०दा प्रयत्न पण उद्धव ठाकरे भेट नाही, आदित्य-वरुण सरदेसाईंसाठी हिंदुत्व भूमिका सोडायला...”
Thackeray Group News: ठाकरे गटाकडे कुठलाही कार्यक्रम नाही, दिशा नाही. पक्ष कुठला तरी कार्यक्रम आणि दिशा घेऊन चालला असता तर एवढ्या लोकांनी पक्ष सोडला नसता. सनातनच्या मुद्द्यावर काँग्रेसकडून शिव्या दिल्या जातात, सावरकरांच्या मुद्द्यावर काँग्रेसकडून टीका होत असताना ठाकरे गटाने कधीच स्पष्ट भूमिका घेतली नाही. ठाकरे गटात समन्वय आणि संवाद नावाची कुठलीही गोष्ट नाही. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर खासदार पक्ष सोडत होते. तेव्हा त्यांच्याशी कोणीही बोलायला तयार नव्हते. अनेकांनी तेव्हा सांगितले की, विनायक राऊत यांच्या दादागिरीला कंटाळून आम्ही पक्ष सोडून चाललो. ठाकरे गटाकडून निवडणुकीत उभे राहिलेल्या उमेदवारांना संघटनेची आणि आर्थिक शक्ती दिली जात नाही अशा स्थितीत ठाकरे गट भाजपासमोर टिकूच शकत नाही, अशी खरमरीत टीका किशोर तिवारी यांनी केली.
ठाकरे गटाकडून प्रवक्ते किशोर तिवारी यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचे आदेश देण्यात आले. यानंतर किशोर तिवारी यांनी पक्षातील अंतर्गत घडामोडींवर बोट ठेवत अनेक गौप्यस्फोट केले. बांगलादेशींमुळे वरुण सरदेसाई, आदित्य ठाकरे निवडून आले; काँग्रेसच्या हिंदूविरोधी वक्तव्यावर बोलू नका, असा आदेश दिला. निवडणुकीच्या काळात प्रवक्ता असतानाही प्रसारमाध्यमांवर हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरण्यापासून रोखण्यात आले होते. कारण मुंबईत वरुण सरदेसाई आणि आदित्य ठाकरेंच्या विजयासाठी मुस्लिमांचा मतदान आवश्यक होते. त्यामुळे हिंदुत्वाची भूमिका मांडण्यापासून पक्षाकडून थांबवण्यात आले, असा गंभीर आरोप किशोर तिवारी यांनी केला.
स्वखर्चाने दहा वेळा उद्धव ठाकरेंना भेटायला गेलो, पण काही उपयोग झाला नाही
शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला, त्याबद्दलही शिवसेनेकडून नाहक नाराची व्यक्त करण्यात आली. उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी पैसे खर्च करून किमान दहा वेळेला मुंबईला गेलो. मात्र कधीच उद्धव ठाकरे यांच्याशी भेट झाली नाही. उलट हाकलून लावण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी कधीच संवाद साधला नाही. फक्त एकदा भेटले आणि मला तुमच्याशी शांतपणे भेटायचे आहे, असे सांगितले. मात्र शांतपणे भेटण्याची ती वेळ आजवर आली नाही, असे किशोर तिवारी यांनी सांगितले. राजन साळवी पक्ष सोडून गेल्यानंतर पक्षात कोणालाही जाग आलेली नाही. ज्याला जायचे आहे ते जा, कोणाच्या जाण्याने काही फरक पडत नाही, पक्षाची अशी भूमिका आत्मघाती आहे, अशी टीकाही किशोर तिवारी यांनी केली.
दरम्यान, संजय राऊत पक्षाचे विचार आणि भूमिका मांडत नाही, ते फक्त स्वतःचे विचार मांडतात. त्यांच्यामुळे ठाकरे गटाची विश्वासार्हता खालवली आहे. संजय राऊत यांनी स्वबळाची भूमिका मांडली आणि दुसऱ्या दिवशीपासून पक्षाला गळती लागली. नागपुरातून आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू दुष्यंत चतुर्वेदी यांनी संजय राऊतांच्या स्वबळाच्या घोषणेमुळेच पक्ष सोडला. शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला, त्याबद्दलही ठाकरे गटाकडून नाहक नाराजी व्यक्त करण्यात आली, असे रोखठोक मत किशोर तिवारी यांनी व्यक्त केले. ते एबीपी माझाशी बोलत होते.