किशोरीताई पंचतत्त्वात विलीन
By admin | Published: April 5, 2017 06:25 AM2017-04-05T06:25:46+5:302017-04-05T06:26:30+5:30
आमोणकर यांच्या पार्थिवावर मंगळवारी संध्याकाळी शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुंबई : अखंड संगीत साधना व प्रतिभेच्या बळावर शास्त्रीय संगीताला भावतत्त्वाचा स्पर्श देणाऱ्या गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या पार्थिवावर मंगळवारी संध्याकाळी शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शाश्वत सुरांचा ध्यास घेतच अखेरचा श्वास घेतलेल्या या दैवी सुराला निरोप देताना मान्यवरांचे कंठ दाटून आले होते.
त्यांच्या निधानामुळे संपूर्ण देशभर शोक व्यक्त करण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, गोव्याचे
सांस्कृतिकमंत्री गोविंद गावडे यांच्यासह अभिनेता आनंद इंगळे, वैभव मांगले,
विक्रम गोखले, भारती आचरेकर, अतुल परचुरे आदी कलाकारांनी अंत्यदर्शन
घेतले. पं. शिवकुमार शर्मा, रघुनंदन पणशीकर, आरती अंकलीकर-टिकेकर, महेश काळे, शशी व्यास, सुरेश वाडकर, अजय पोहनकर, डी. के. दातार, मंगेश बोरगावकर आदी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
>भारतीय अभिजात संगीताचा अपरिमीत हानी झाली. त्या नसल्या, तरी त्यांचे संगीत आपल्याला निर्मळ आनंद देत राहील. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
>किशोरीतार्इंच्या निधनाने प्रयोगशीलता आणि संवेदना जपणाऱ्या एका ख्यातनाम आणि महान शास्त्रीय गायिकेला आपण मुकलो आहोत.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
>किशोरीतार्इंचे सोमवारी रात्री मुंबईतील निवासस्थानी निधन झाले. मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत त्यांचे पार्थिव रवींद्र नाट्यमंदिराच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कल्चरल अकादमीच्या सभागृहात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. तेथून ४ च्या सुमारास अंत्ययात्रा निघाली. शिवाजी पार्क स्मशानभूमीत संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास बिभास व निहार या किशोरीतार्इंच्या दोन मुलांनी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.