Maharashtra Political Crisis: “भारताच्या १००व्या स्वातंत्र्य दिनी आदित्य ठाकरे दिल्लीतून येऊन ध्वजारोहण करतील”
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 02:01 PM2022-08-15T14:01:42+5:302022-08-15T14:02:13+5:30
Maharashtra Political Crisis: देशाच्या ५० व्या स्वातंत्र्यदिनी बाळासाहेबांनी ध्वजारोहण केले होते. ७५ व्या वर्षी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी झेंडावंदन केले. १०० व्या वर्षी आदित्य ठाकरे करतील, असे किशोरी पेडणेकरांनी म्हटले आहे.
Maharashtra Political Crisis: एकीकडे संपूर्ण देशभरात भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Independence Day 2022) साजरा केला जात आहे. मात्र, यातच आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देशातील समस्यांवर बोट ठेवत केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच सडकून टीका केली आहे. यातच आता शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी एक मोठा दावा केला आहे. भारताच्या १००व्या स्वातंत्र्य दिनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) दिल्लीतून येऊन ध्वजारोहण करतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना किशोरी पेडणेकर यांनी सदर वक्तव्य केले. किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, शिवसेना भवनात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याआधी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते ५०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवसेना भवनात ध्वजारोहण करण्यात आले होते. आता पुढे देशाचा १०० वा स्वातंत्र्य दिन असेल तेव्हा आदित्य ठाकरे हे दिल्लीतून येऊन झेंडावंदन करतील, असा विश्वास किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला.
घराणेशाहीबाबत फक्त ठाकरेंवर निशाणा का साधताय
देशाच्या स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव करत असताना देशात अडचणीदेखील तेवढ्याच आहेत. महिलांना सक्षम करण्यासाठी संसदेत आणि विधीमंडळात महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण लागू करण्याची मागणी त्यांनी केली. घराणेशाहीबाबत बोलताना किशोरी पेडणेकर यांनी म्हटले की, घराणेशाहीबाबत फक्त ठाकरेंवर निशाणा का साधत आहात, असा प्रश्न करत, भाजपमध्येही नेत्यांच्या मुलीला, मुलाला संधी मिळत असते, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
दरम्यान, केवळ हर घर तिरंगा मोहीम न राबवता देशातील घरोघरी वाढलेली महागाई कमी कसा होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे, असा टोला शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी लगावला. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात काहींकडे महत्त्वाची, मोठी खाती होती. दादा भुसे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी आम्ही सोपवली होती. पण, हे खाते वाटप पाहता त्यांना काय मिळाले हा प्रश्न सगळ्यांना पडला असल्याचे अहिर यांनी म्हटले. भाजपच्या विचारांच्या अजेंड्यावर हे सरकार काम करत असून चांगली खाती भाजपच्या आमदारांना देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.