सर्पमित्राचा ‘किस आॅफ डेथ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2017 05:26 AM2017-02-07T05:26:44+5:302017-02-07T05:26:44+5:30

कारमधून पकडलेल्या विषारी सापाला पुन्हा जंगलात सोडण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या मृत्यूची घटना घडली आहे. हा सर्पमित्र बेलापूर गावचा राहणारा असून घटनेनंतर त्याच्यावर तीन दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते

'Kiss of Death' by Sarpitarra | सर्पमित्राचा ‘किस आॅफ डेथ’

सर्पमित्राचा ‘किस आॅफ डेथ’

Next

नवी मुंबई : कारमधून पकडलेल्या विषारी सापाला पुन्हा जंगलात सोडण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या मृत्यूची घटना घडली आहे. हा सर्पमित्र बेलापूर गावचा राहणारा असून घटनेनंतर त्याच्यावर तीन दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते. यापूर्वी त्याने शंभरहून अधिक सर्पांना जीवदान दिले आहे.
सोमनाथ म्हात्रे असे सर्पमित्राचे नाव आहे. परिसरात सर्पमित्र म्हणून तो सर्वांना परिचित होता. लोकवस्तीच्या ठिकाणी विषारी अथवा बिनविषारी साप आल्याची माहिती मिळताच तो सापाच्या मदतीसाठी धाव घेत असे. तसेच त्या सापाला जिवंत पकडून रहिवासी ठिकाणांपासून लांब झाडीमध्ये सोडून त्यांना जीवदान देत असे. अशाप्रकारे त्याने शहराच्या विविध ठिकाणावरून पकडलेल्या शंभरहून अधिक सापांना जीवदान दिल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच त्याला राहत्या परिसरातील एका कारमध्ये साप असल्याची माहिती मिळाली होती. यावरून त्याने घटनास्थळी जावून जिवंत सापाला पकडले होते. परंतु या सापाला लोकवस्तीपासून दूरवर सोडण्यासाठी तो गेला असता, त्याठिकाणी सोमनाथ
म्हात्रे याला त्या सापाने दंश केल्याचे समजते. त्याला मागील तीन दिवसांपासून खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र दंश करणारा साप कोब्रा असल्यामुळे त्याच्या दंशाने सोमनाथच्या शरीरात त्याचे विष पसरले होते. अखेर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूमुळे म्हात्रे कुटुंबीयांसह निकटवर्तीय व सर्पमित्रांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Kiss of Death' by Sarpitarra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.