...कितने आदमी थे, ६५ में से ५० निकल गये!; देवेंद्र फडणवीस यांची शोले स्टाईल टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 06:15 AM2022-08-21T06:15:21+5:302022-08-21T06:15:34+5:30
मला अमिताभ बच्चन म्हटले गेले. पण मी दिसताे अमजद खानसारखा. पण मी हे नक्की विचारू शकतो की, ‘कितने आदमी थे...
मुंबई :
मला अमिताभ बच्चन म्हटले गेले. पण मी दिसताे अमजद खानसारखा. पण मी हे नक्की विचारू शकतो की, ‘कितने आदमी थे... ६५ मे से ५० निकल गये, और सब कुछ बदल गया,’ अशा शब्दांत उपमुुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात शनिवारी शिवसेनेवर तोंडसुख घेतले.
महाराष्ट्रापासून वेगळी करणार, महाराष्ट्राचे आता तुकडे पाडणार असे दरवेळचे डायलॉग आता महापालिका निवडणूक जवळ येईल तसे सुरू होतील, अहो! जरा डायलॉग तरी बदला, असे टोले त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेसोबत मुंबई महापालिकेवर भगवा फडकवणारच असेही ते म्हणाले.
कॅबिनेट मंत्री झाल्याबद्दल मंगलप्रभात लोढा यांचा आणि मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल आशिष शेलार यांचा सत्कार षण्मुखानंद सभागृहात फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी फडणवीस म्हणाले की, निवडणूक जवळ आल्यावर भावनिक मुद्दे सुरू होतील. याला लोक कंटाळले आहेत.
फडणवीस हे अमिताभ; शेलार बिनीचे शिलेदार
फडणवीस हे राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत, असे लोढा म्हणाले. शेलार म्हणाले की, म्हणूनच फडणवीस जहाँ खडे होते है, लाइन वही से शुरू होती है. फडणवीस म्हणाले की युद्धासाठी शिवाजी महाराज बिनीच्या शिलेदारांना पाठवायचे, मुंबई सर करण्यासाठी श्रेष्ठींनी शेलार यांना पाठविले आहे.
ही तर मोदी पर्व संपल्याची नांदी : ठाकरे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मुंबई महापालिकेत सत्ता हवी आहे, असे म्हणणे हे मोदी पर्व संपल्याची नांदी आहे, असे प्रत्युत्तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. ठाकरे यांनी निवेदनात म्हटले आहे की, भाजपच्या धोरणानुसार वापर संपला की नवीन नाव शोधायचा असा प्रकार सुरु आहे.
आशिष शेलार क्रिकेटशी संबंधित आहेत त्यांना आता राजकारणात ट्वेंटी, ट्वेंटी खेळायची आहे. एमसीएमध्ये शेलारांनी मुंबई प्रीमियर लीग सुरू केली आहे. आता पालिकेत मुंबई महापालिका विकास लीग तयार करायची आहे.
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री