हीच का ‘नॅक’ची तयारी?
By admin | Published: July 24, 2014 12:58 AM2014-07-24T00:58:52+5:302014-07-24T00:58:52+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ९ ते ११ सप्टेंबरदरम्यान ‘नॅक’ समिती पाहणीसाठी येणार आहे. यासाठी विद्यापीठ प्रशासन जोमाने तयारी लागले आहे. अमरावती मार्गावरील महात्मा
नागपूर विद्यापीठ : ‘कॅम्पस’चे हाल बेहाल
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ९ ते ११ सप्टेंबरदरम्यान ‘नॅक’ समिती पाहणीसाठी येणार आहे. यासाठी विद्यापीठ प्रशासन जोमाने तयारी लागले आहे. अमरावती मार्गावरील महात्मा फुले शैक्षणिक परिसर म्हणजेच ‘कॅम्पस’ येथील विभागांच्या रंगरंगोटीचे कामदेखील जोरात सुरू आहे. परंतु विद्यापीठाकडून करण्यात येणार असणारा हा प्रकार परीक्षेच्या तोंडावर पुस्तक उघडण्यासारखाच आहे. एरवी या विभागांकडे प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत होते. परंतु ‘नॅक’ समिती येणार म्हटल्यावर प्रशासनाला जाग आली आहे.
प्रशासन गेल्या काही आठवड्यांपासून युद्धस्तरावर तयारीला लागले असले तरी, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी अजूनही प्रचंड अव्यवस्था असल्याचे दिसून येत आहे. ‘बाहरसे टामटूम, अंदरसे रामजाने’ यासारखा हा प्रकार असल्याची भावना येथील कर्मचाऱ्यांनीच व्यक्त केली आहे.
विद्यापीठाचे ‘कॅम्पस’ म्हटले की डोळ्यासमोर येते ते शांत, स्वच्छ व मनाला समाधान देणारे वातावरण. पण आधुनिकतेचा दावा करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘कॅम्पस’मध्ये नेमके विरुद्ध चित्र दिसून येत आहे. नागपूर विद्यापीठाच्या अमरावती रोडवरील महात्मा फुले शैक्षणिक परिसरात निरनिराळ्या अभ्यासक्रमांचे पदव्युत्तर विभाग आहेत. त्यामुळे या ना त्या कारणाने येथे वर्षभर विद्यार्थ्यांची उपस्थिती असतेच.
‘कॅम्पस’च्या भव्य प्रवेशद्वारातून ‘एन्ट्री’ केल्यानंतरच परिसरातील अव्यवस्था दिसून येते. रिकाम्या जागी साचलेले मातीचे ढीग, वाढलेले गवत-वनस्पती.
रस्ते तर असे की त्यावरून दुचाकी चालविताना ती कधी घसरेल याची शाश्वती नाही. एकीकडे दरवर्षी येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असताना, अस्वच्छता व असुविधेचे प्रमाण मात्र वाढीस लागले आहे.
‘कॅम्पस’च्या या ‘डर्टी पिक्चर’मुळे विद्यार्थी, शिक्षक व विभागांतील कर्मचारी प्रचंड प्रमाणात हैराण झाले आहेत. अशास्थितीत ‘नॅक’समोर केवळ दिखावा करण्यासाठी सध्या ‘कॅम्पस’चा ‘मेकअप’ सुरू आहे.
अनेक विभागांमध्ये रंगरंगोटी झाली असून, काही ठिकाणी काम सुरू आहे. परंतु ऐन पावसाळ्यात होणारी रंगरंगोटी खरेच किती काळ टिकणार हादेखील महत्त्वाचा प्रश्न आहे. सोबतच अनेक विभागांमधील आतील स्थिती फारशी चांगली नाही. वर्गखोल्यांमध्ये अस्वच्छता कायम असून, विभागांच्या छतांवर अडगळीचे सामान गोळा करून ठेवण्यात आले आहे.
‘नॅक’ समितीचा दौरा जवळ आला की या गोष्टी साफदेखील होतील. परंतु विद्यार्थी मागणी करीत असताना विभागांची स्वच्छता झाली नाही अन् आता ‘नॅक’समोर ‘आॅल इज वेल’ दाखविण्यासाठी धडपड किती योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)
‘मिनी’ जंगल
‘कॅम्पस’मधील सर्वच विभागांदरम्यान मोठ्या प्रमाणात मोकळी जागा आहे. या जागेचा उपयोग करून विद्यापीठाला चांगले प्रशस्त अन् आकर्षक उद्यान तयार करता आले असते. परंतु जागोजागी वाढलेले गवत अन् वनस्पती यांचेच प्रमाण जास्त आहे. जनसंवाद विभाग, रसायनशास्त्र विभाग, होमसायन्स, सांख्यिकीशास्त्र, मानसशास्त्र या विभागांजवळ तर अक्षरश: मिनी जंगलच असल्याप्रमाणे वनस्पती वाढल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी विद्यापीठाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले होते. त्यातील अनेक रोपटी आता मोठी झाली असली तरी, त्यांच्या आजूबाजूला गवताची वाढ झालेली आहे. विभागप्रमुखांच्या पुढाकारामुळे अनेक विभागांमध्ये स्वच्छता राखली जात असली तरी, काही विभागांच्या सभोवताली अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले आहे.
रस्ते गेले ‘खड्ड्यात’
‘कॅम्पस’मध्ये निरनिराळ्या विभागांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. अनेक रस्त्यांचे काही काळापूर्वीच डांबरीकरण झाले होते. परंतु तरीदेखील अनेक ठिकाणी उखडलेले डांबर, खड्डे यामुळे विद्यार्थी व शिक्षकांना त्रास सहन करावा लागतो. पावसाळ््यात तर सांख्यिकीशास्त्र, ट्रॅव्हल अॅन्ड टुरिझम , मानसशास्त्र या विभागांपर्यंत पोहोचण्यासाठी अक्षरश: कसरतच करावी लागते. शिवाय विद्यार्थ्यांना शुल्क भरणा करण्यासाठी असलेल्या ‘काऊंटर’वर तर अक्षरश: कसरत करीत जावे लागत आहे.
उद्यानांची दुरवस्था
विद्यापीठाच्या ‘कॅम्पस’ परिसरात लहान-मोठ्या प्रमाणात जवळपास १० उद्याने आहेत. यांच्या देखभालीसाठी लाखो रुपये खर्च होतात. परंतु अनेक उद्यानांची दुरवस्था झाली आहे. ‘कॅम्पस’मध्ये पाण्याची कमतरता असल्याने उद्यानांंमध्ये हिरवळ नाही, असे कारण प्रशासनाकडून देण्यात आले आहे.