Sushma Andhare: ५१ रुपये घेऊन सोडले घर! शिवसेनेच्या रणरागिणी सुषमा अंधारेंचे शिक्षण किती? संघर्षातून घडले नेतृत्व
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 10:16 AM2022-10-11T10:16:58+5:302022-10-11T10:17:53+5:30
Sushma Andhare: खडतर आणि संघर्षमय आयुष्य जगत वक्तृत्व स्पर्धांमधील बक्षिसातून सुषमा अंधारे यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्याचे सांगितले जाते.
Maharashtra Politics: एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून शिवसेनेला मोठी गळती लागल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना वाचवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मोठ्या प्रमाणात सक्रीय झाले. उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी अनेकांनी शिवसेनेत प्रवेश करत शिवबंधन बांधले. मात्र, कमी कालावधीत शिवसेनेच्या धडाडीच्या रणरागिणी बनलेल्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर अनेकदा तुटून पडल्याचे दिसून आले. मात्र, सुषमा अंधारे यांचे आयुष्य अत्यंत खडतर आणि संघर्षाचे राहिलेले आहे. सुषमा अंधारे यांचे शिक्षण किती आहे? जाणून घेऊया...
शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणातून सुषमा अंधारे यांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले. सुषमा अंधारे या शिवसेनेची धडाडणारी तोफ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या आहेत. सुषमा अंधारे यांनी आपल्या भाषणाने आपल्या भाषणाने शिवसैनिकांमधील जोश, उत्साह कायम ठेवला आहे. राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि कायद्याचा व्यासंग सुषमा अंधारे यांना आहे. सुषमा अंधारे यांनी पाहिलेली गरिबी, समाजव्यवस्था, त्यांचा चळवळीतील अनुभव हे त्यांच्या प्रभावशाली भाषणामागचे गमक असल्याचे बोलले जाते.
वक्तृत्व स्पर्धातील बक्षिसातून शिक्षण पूर्ण
सुषमा अंधारे यांनी शिक्षण घेण्यासाठी घरावर तुळशीपत्र ठेवले. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर घरच्यांनी त्यांना ५१ रुपये बक्षिस म्हणून दिले होते. ही रक्कम घेऊन त्या लातूरला शिक्षण घेण्यासाठी निघून गेल्या. वक्तृत्व स्पर्धातून मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. लातूर जिल्ह्यातील मुरुड हे सुषमा अंधारे यांचे मूळ गाव आहे. येथे त्यांनी बारावीपर्यंत शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी बसवेश्वर कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. येथे त्यांनी राज्यशास्त्रामध्ये एमए केले. पुढे उमरगा येथे त्यांनी बीएड केले. हे सर्व सुरु असताना त्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेत असत.
दरम्यान, सुषमा अंधारे या भटक्या विमुक्त समाजातून येतात. सुषमा अंधारे या शिवसेनेत येण्याआधी गणराज्य संघच्या माध्यमातून काम करत होत्या. सुषमा अंधारे यांचे आजोबा कबीरपंथी होते. म्हणून सुषमा यांनी त्यांच्या मुलीचे नाव कबीरा असे ठेवले. सुषमा यांना लहानपणी रुबाब म्हटले जायचे, असे सांगितले जाते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"