Maharashtra Politics: गिरीश बापट यांचे निकटवर्तीय, गणेश मंडळाचा कार्यकर्ता ते नगरसेवक; कोण आहेत हेमंत रासने?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 04:38 PM2023-02-04T16:38:33+5:302023-02-04T16:45:32+5:30
Maharashtra Politics: भाजपने विधानसभा निवडणुकीची संधी दिली आहे. या संधीचे सोने करून दाखवणार, असा विश्वास हेमंत रासणे यांनी व्यक्त केला आहे.
Maharashtra Politics: विधान परिषदेची पदवीधर मतदारसंघातील निवडणूक झाल्यानंतर आता पुण्यातील कसबा आणि पिंपरी-चिंचवड येथे रिक्त झालेल्या जागेवरील पोटनिवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या दोन्ही ठिकाणची पोटनिवडणूक लढण्यावर महाविकास आघाडी ठाम आहे. परंतु ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. यातच भाजपने या दोन्ही जागांसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने कसब्यातून हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. तर चिंचवडमधून दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे.
विधान परिषद निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजप पुन्हा एकदा पोटनिवडणुकीच्या तयारीला लागल्याचे सांगितले जात आहे. पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा उमेदवार निवडताना भाजप कार्यकारिणीच्या अनेक बैठका पार पडल्या. अनेक पैलूंवर सखोल चर्चा केल्यानंतर अखेर भाजपने कसबा आणि चिंचवड येथील उमेदवारांची नावे जाहीर केली. चिंचवडमधून अश्विनी जगताप हा घरातीलच उमेदवार दिला असून, कसब्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आलेले हेमंत रासने कोण आहेत? यावरून चर्चा सुरु झाली आहे.
भाजपाने संधी दिली, या संधीचे सोने करून दाखवणार
उमेदवारी जाहीर होताच हेमंत रासने थेट दगडू शेठ गणपतीच्या दर्शनासाठी गेले. सच्चे गणेशभक्त म्हणून ते लोकप्रिय आहेत. हेमंत रासने हे सलग चारवेळा पुणे महापालिकेचे नगरसेवक आहेत. सलग तीनवेळा महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष पदावर त्यांनी कार्य केले आहे. गणेश मंडळाच्या माध्यमातून कसब्यात रासने यांचे काम मोठे आहे. श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर ट्रस्टचे विश्वस्त आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि खासदार गिरीश बापट यांचे ते निकटवर्तीय आहेत, असे सांगितले जाते. भाजपने विधानसभा निवडणुकीची संधी दिली आहे. या संधीचे सोने करून दाखवणार. कसबा पेठ पोटनिवडणूकित विक्रमी मतांनी निवडून येईन, असा विश्वास हेमंत रासने यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर व्यक्त केला.
दरम्यान, एक गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून पक्षाने मला उमेदवारी दिली. आम्हाला रणनीती करण्याची गरज नाही, सर्वसामान्य नागरिकांचा आशीर्वाद आमच्या पाठिशी आहे. नगरसेवक आणि त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष म्हणून कसब्यात काम केले आहे, त्याला जनता आशीर्वाद देईल, असे हेमंत रासने यांनी सांगितले. दुसरीकडे, मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी नाराजी उघडपणे बोलून दाखवली. एवढ्या आजारपणातही मुक्ता टिळक यांनी पक्षासाठी काम केले. त्यांच्या कामावर अन्याय झाल्याची भावना शैलेश टिळक यांनी बोलून दाखवली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"