जानकर, सदाभाऊ खोत यांचा लाल दिवा निश्चित
By admin | Published: November 14, 2015 03:53 AM2015-11-14T03:53:23+5:302015-11-14T03:53:23+5:30
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार २७ नोव्हेंबरला होणार हे निश्चित झाले असून, यामध्ये घटक पक्षांसह भाजपा-शिवसेनेच्या १० जणांचा समावेश होणार आहे
कोल्हापूर : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार २७ नोव्हेंबरला होणार हे निश्चित झाले असून, यामध्ये घटक पक्षांसह भाजपा-शिवसेनेच्या १० जणांचा समावेश होणार आहे. स्वाभिमानी संघटनेकडून सदाभाऊ खोत व राष्ट्रीय समाज पक्षाकडून आमदार महादेव जानकर यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
मंत्रिमंडळाच्या विस्ताराला दिवाळीनंतरचा तरी मुहूर्त लागणार का, या प्रश्नावर पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लंडन दौऱ्यावर आहेत. ते परत आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब होईल. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने खासदार रामदास आठवले यांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावे, अशी आमची इच्छा आहे; पण ते स्वत: तयार नाहीत, त्यामुळे त्यांची पत्नी सीमा आठवले अथवा दुसऱ्या नेत्यांचे नाव दिले जाऊ शकते. आमदार विनायक मेटे यांचाही मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. याशिवाय शिवसेनेच्या वाट्याला गेलेल्या दोन जागांचा विस्तारात समावेश आहे. उर्वरित ६पैकी चौघा जणांना भाजपाच्या वतीने संधी दिली जाणार आहे. राजकीय डावपेचाचा भाग म्हणून २ जागा रिक्त ठेवल्या जाणार आहेत. (प्रतिनिधी)
मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंडळाचे अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. नोव्हेंबरमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन आहे.
त्यानंतर जानेवारीमध्ये महामंडळांवरील सर्व नियुक्त्या केल्या जातील, अशी माहितीही मंत्री पाटील यांनी दिली.
महामंडळांवरील नियुक्त्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्राला झुकते माप मिळेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.