ज्ञान-विज्ञानाधिष्ठित समाज सत्यात यावा

By admin | Published: January 18, 2016 12:52 AM2016-01-18T00:52:20+5:302016-01-18T00:52:20+5:30

मी एक स्वप्न पाहिले आहे, ज्ञानाधिष्ठित आणि विज्ञानाधिष्ठित समाजाचे, ते सत्यात उतरावे, अशी ईश्वराकडे प्रार्थना करणार आहे. माझे वय ७३ वर्षे आहे. शास्त्रज्ञ असूनही भावूक होऊन देवाकडे मागणे मागतो

Knowledge of science-based society should come true | ज्ञान-विज्ञानाधिष्ठित समाज सत्यात यावा

ज्ञान-विज्ञानाधिष्ठित समाज सत्यात यावा

Next

संजय माने, ज्ञानोबा-तुकारामनगरी (पिंपरी)
मी एक स्वप्न पाहिले आहे, ज्ञानाधिष्ठित आणि विज्ञानाधिष्ठित समाजाचे, ते सत्यात उतरावे, अशी ईश्वराकडे प्रार्थना करणार आहे. माझे वय ७३ वर्षे आहे. शास्त्रज्ञ असूनही भावूक होऊन देवाकडे मागणे मागतो. देवा माझे यापुढचे सर्व आयुष्य घे, परंतु मला त्यातील केवळ एकच दिवस दे, त्या दिवशी मला या देशात माझे स्वप्न साकारल्याचे पाहता येईल. त्यांच्या या वाक्यावर काही क्षणांत सर्वजण जागेवर उभे राहिले. नकळत जणूकाही त्यांना मानवंदनाच देण्यात आली.
पिंंपरीत ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ शास्त्रज्ज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. सागर देशपांडे आणि डॉ. अभय जेरे यांनी मुलाखत घेतली. बालपण ते संशोधन क्षेत्रात केलेली भरीव कामगिरी, बिकट परिस्थितीवर जिद्दीने केलेली मात, असा आयुष्याच्या विविध टप्प्यांवरील जीवनपट त्यांच्या मुलाखतीतून उलगडला.
‘गांधीयन इंजिनिअरिंंग’ ही आपण मांडलेली संकल्पना काय आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना, ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा फायदा केवळ श्रीमंत वर्गालाच नव्हे तर गरिबातल्या गरिबाला झाला पाहिजे असा या संकल्पनेमागील मूळ उद्देश आहे. उच्च तंत्रज्ञान स्वस्तात समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे हीच अपेक्षा गांधीयन इंजिनिअरिंग संकल्पनेत दडली असल्याचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी सांगितले.
आपण जिंकू शकतो हीच भावना बाळगली जात नाही. आजवर आपण अमेरिका, जपान या देशांशी तुलना करत होतो. आपणही संशोधन आणि अन्य क्षेत्रात मागे नाही. हे हळदीच्या आणि बासमती तांदळाच्या यशस्वी पेटंट लढ्याने दाखवून दिले आहे. अमेरिकेविरुद्धचा पेटंट लढा आपण जिंकला. आपण जिंकू शकतो ही सकारात्मक भावना जोपासली गेली तर यश सहज शक्य आहे. आपल्याकडे बौद्धिक संपदा आहे. येथेही नवनव्या संकल्पना आकार घेतात. आपणा सर्वांमध्ये क्षमता आहे. त्या क्षमतांचा वापर झाला पाहिजे. आत्मविश्वास वाढला पाहिजे. ही तळमळ डॉ. माशेलकर यांनी व्यक्त केली.
आपल्याच देशातील एका तरुणाने वैद्यकीय क्षेत्रात उपयुक्त ठरेल असा मोबाईलवर ईसीजी काढण्याचा क्रांतिकारी शोध लावला हे सांगून त्यांनी राहुल रुस्तुगी या उदयोन्मुख संशोधकाचे कौतुक केले. विविध देशांतील ६० हजार संशोधक असलेल्या ग्लोबल रिसर्च अलाईन्स या संस्थेचे अध्यक्षपद डॉ. माशेलकर यांच्याकडे आहे. विशेष म्हणजे त्याचे मुख्यालय पुण्यात आहे ही बाब संवादक देशपांडे यांनी निदर्शनास आणून देताच उपस्थितांनी टाळ्यांची दाद दिली.
गोव्यातील माशेल या छोट्या गावात जन्म झाला. बालपणीच पित्याचे छत्र हरपले. आई अंजनीबाई यांनीच आयुष्याला दिशा दिली. माशेल गावातून बाहेर पडल्यावर
मुंबईत गिरगावच्या एका चाळीत राहिलो. दोन वेळची खाण्याची भ्रांत अशी बिकट
परिस्थिती होती.
खेतवाडीतील महापालिकेच्या शाळेत शिकलो. रस्त्यांवरील दिव्यांच्या प्रकाशात अभ्यास केला. नगरपालिकेच्या तेसुद्धा
मराठी शाळेत शिकलो तरीही प्रगतीला कोणतीच बाधा आली नाही हे त्यांनी आवर्जून नमूद केले.
सातवी उत्तीर्ण झाल्यावर आठवीत प्रवेश घेण्यासाठी २१ रुपयांची गरज होती. ही रक्कम जमा करण्यास आईला २१ दिवस लागले. पुढे प्रवेश घेण्यास विलंब झाला. नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळण्याऐवजी गरीब शाळा वाट्याला आली. असा खडतर प्रवास मांडल्यानंतर उपस्थितांना गहिवरून आले.
शाळा गरीब, शिक्षक होते श्रीमंत
ज्या शाळेत शिकलो, त्या शाळा जरी गरीब असल्या तरी तेथील शिक्षक श्रीमंत होते, ज्ञानदानाच्या कार्यात या अर्थाने ते शिक्षक श्रीमंत होते. गणित विषय शिकविणारे कोल्हटकरगुरुजी आणि इंग्रजी शिकविणारे भावे सर सद्यस्थितीत पहाावयाला मिळत नाहीत. आताच्या काळात गुरुजनांना प्रतिष्ठा उरली नाही. त्या काळात चांगले शिक्षक लाभले, हे माझे भाग्य समजतो. मराठी शाळा, महापालिकेच्या शाळा बंद होताहेत, विद्यार्थी या शाळांकडे पाठ फिरवताहेत याची खंत वाटते. या शाळा टिकल्या पाहिजेत. म्हणून मराठी ही ज्ञानभाषा व्हावी, असा आपला आग्रह आहे. बालकेंद्रित शिक्षणाला प्राधान्य दिले गेले पाहिजे. पुण्यात सायन्स काँग्रेसच्या अधिवेशनात मूल्याधिष्ठित समाजासाठी पंचशील सूत्री सांगून बालकेंद्रित शिक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता.
उद्योगपती टाटा यांच्यासोबत स्वाक्षरी करण्याचा योग
महाविद्यालयीन जीवनात ज्या बॉम्बे हाऊसमध्ये ६० रुपये शिष्यवृत्ती घेण्यासाठी जायचो, त्याच ठिकाणी आता संचालक मंडळातील सदस्य म्हणून जातो. एवढेच नव्हे तर बेंजामिन फ्रँकलिन यांनी अमेरिकेत स्थापन केलेल्या संस्थेत जगभरातील नामांकित व्यक्ती सदस्य आहेत, त्यात केवळ सात भारतीयांचा समावेश असून, सहाव्या क्रमांकावर उद्योगपती रतन टाटा आणि सातव्या क्रमांकावर डॉ. रघुनाथ माशेलकर हे नाव आहे. ज्या संस्थेची शिष्यवृत्ती घेतली, त्या संस्थेचे प्रमुख टाटा यांच्याबरोबर एकाच कागदावर स्वाक्षरी करण्याचा योग येईल, असे कधी वाटले नव्हते; परंतु हा योगायोग केवळ शिक्षणामुळे घडून आला.
‘आॅटोग्राफ’साठी उडाली झुंबड
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने दहावीच्या पुस्तकात डॉ. माशेलकर यांच्यावर धडा समाविष्ट केला आहे. मुखपृष्ठावर त्यांचे छायाचित्र असल्याने उपस्थित विद्यार्थ्यांनी त्यांना भेटण्यासाठी गर्दी केली होती. पालकांसह आलेल्या या विद्यार्थ्यांनी गर्दीतून वाट काढत आॅटोग्राफसाठी त्यांची भेट घेतली. कार्यक़्रम संपल्यानंतर आॅटोग्राफसाठी अक्षरश: झुंबड उडाली होती.

Web Title: Knowledge of science-based society should come true

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.