कोकाकोला, रिफायनरीत हजारोंना रोजगार!
By admin | Published: July 1, 2015 10:47 PM2015-07-01T22:47:16+5:302015-07-02T00:28:17+5:30
रत्नागिरी : भविष्यात येणाऱ्या अनेक उद्योगांमुळे जिल्हा बनणार उद्योगनगरी...
रत्नागिरी : जिल्ह्यात येत्या काही वर्षात अनेक मोठे उद्योग येणार आहेत. गुहागरमध्ये रिफायनरी, हर्मन फिनोकेम, हिंदुस्थान पेपर कार्पाेरेशनसारख्या कंपन्या जिल्ह्यात येणार असतानाच आता कोकाकोलाचा ५०० कोटींचा प्रकल्प जिल्ह्यातील लोटे-परशुराम वसाहतीत उभारला जाणार आहे. त्याबाबतच्या करारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमेरिका भेटीत स्वाक्षरीही केली आहे. जिल्ह्यात येणाऱ्या या उद्योगांचे स्वागत नक्कीच होईल, परंतु या उद्योगांमध्ये स्थानिकांना नोकऱ्या उपलब्ध होणे आवश्यक असूून, त्यामुळे मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये जाणारे बेरोजगारांचे लोंढे कमी होण्यास मदत होईल, अशी चर्चा आता जिल्ह्यात सुरू झाली आहे.
लोटे येथे होणाऱ्या कोकाकोलाच्या प्रकल्पासाठी अनेक गोष्टी पूरक ठरणाऱ्या आहेत. या ठिकाणी कोयनेचे अवजल आहे. कोकण रेल्वे मार्ग जवळ आहे. आवश्यकतेनुसार दापोली व गुहागर बंदरांचा वापर करणेही शक्य आहे. चिपळूण रेल्वेस्थानकही प्रकल्पस्थळापासून जवळ असल्याने कन्याकुमारीपर्यंत वाहतूक करणे कमी खर्चाचे व सहज शक्य होणारे आहे. या पार्श्वभूमीवर कोकाकोलाचा प्रकल्प येथे उभारला जाणार हे आता निश्चित झाले आहे. कोकाकोलाप्रमाणेच जिल्ह्यात गुहागर तवसाळ येथे बीपीसीएल व इंडियन आॅईल कंपन्यांमार्फत संयुुक्तपणे रिफायनरी प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पाचे दोन टप्पे असून, दोन्ही टप्पे प्रत्येकी २२ हजार कोटींचे आहेत. त्यामुळे खूप मोठी गुंतवणूक जिल्ह्यात या उद्योगाच्या रुपाने होणार आहे. प्रकल्पाचे काम ३ ते ४ वर्षे चालणार आहे. त्यामुळे प्रकल्प उभारणी सुरू असताना येथे १५ ते २० हजार कर्मचारी लागणार आहेत. प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर ५ हजार कायम कामगार लागणार आहेत. येणाऱ्या या व अन्य प्रकल्पांतील कामगारांची, रोजगाराची क्षमता मोठी आहे. त्यातील किमान ५० टक्के रोजगार हा प्रकल्पग्रस्त व जिल्ह्यातील बेरोेजगारांना मिळाला पाहिजे, यासाठी आतापासूनच येथील संस्थांनी, राजकीय नेत्यांनी आवश्यक रणनीती आखून बेरोजगारांना रोजगार कसा मिळेल, यासाठी सतर्क राहिले पाहिजे. (प्रतिनिधी)
कोकाकोलाचा ५०० कोटींचा प्रकल्प जिल्ह्यातील लोटे-परशुराम वसाहतीत उभारला जाणार.
प्रकल्पासाठी अनेक गोष्टी पूरक ठरणाऱ्या.
दापोली व गुहागर बंदरांचा वापर करणेही शक्य.
कन्याकुमारीपर्यंत वाहतूक करणे कमी खर्चाचे.