कोकण, मराठवाड्यात परतीच्या पावसाचा कहर!

By Admin | Published: September 24, 2016 03:52 AM2016-09-24T03:52:03+5:302016-09-24T06:35:59+5:30

कोकणासह मराठवाड्यात शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी पावसाने कहर केला.

Kokan, Marathwada returning rains! | कोकण, मराठवाड्यात परतीच्या पावसाचा कहर!

कोकण, मराठवाड्यात परतीच्या पावसाचा कहर!

googlenewsNext


मुंबई/कोल्हापूर/औरंगाबाद : कोकणासह मराठवाड्यात शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी पावसाने कहर केला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून नद्या, ओढे दुथडी भरून वाहू लागले आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिवसभरात पावसाचे पाच बळी गेले. बीडमध्ये तीन जण पुरात वाहून गेले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात दिवसभरात सरासरी ५५ मि.मी. पाऊस झाला. भूम तालुक्यातील साडेसांगवी येथील पृथ्वीराज सुनील देवकते (४) या बालकाचा भिंत अंगावर पडल्याने मृत्यू झाला़ बीड जिल्ह्यात ६३पैकी १९ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. पाटोदा तालुक्यातील जवळगा येथील त्रिंबक केकाण (५०), कुर्ला येथे प्रभू विठ्ठल केशवे (४५) आणि माजलगाव तालुक्यातील पात्रूड येथील माणिक धोंडिबा गायकवाड (४०) हे पुरात वाहून गेले. विष्णूपुरी प्रकल्पात पाण्याची आवक वाढल्याने तीन दरवाजे उघडले़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
कोकणात अतिवृष्टीने घातले थैमान
अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका खेड तालुका तसेच चिपळूण शहराला बसला. खेड तालुक्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक ठिकाणचे मार्ग पाण्याखाली गेले आहेत. खेडमधील जगबुडी पुलावरून पुराचे पाणी गेल्याने गुरुवारी रात्री १० वाजल्यापासून ठप्प झालेली रस्ते वाहतूक शुक्रवारी अंशत: सुरू झाली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. ओसरगाव येथे महामार्गावर विजेच्या तारा कोसळल्याने वाहतूक अर्धा तास खोळंबली होती. जिल्ह्यातील बहुतांशी पूल पाण्याखाली गेले आहेत. माणगाव खोरे आणि तळवडे भागात पुले पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. पश्चिम महाराष्ट्रातही चांगला पाऊस झाला. सातारा जिल्ह्यातील खटाव, फलटण, या दुष्काळी तालुक्यांसह पाटण तालुक्यालाही पावसाने झोडपून काढले. कोल्हापूर शहरात हलक्या सरी कोसळल्या.
................
नाशिक जिल्ह्यात वीज पडून तिघांचा मृत्यू
येवला तालुक्यातील ममदापूर येथे शेतात वीज पडून संतोष जगन्नाथ गुडघे (३२),वर्षा नवनाथ गुडघे हे दोघे दीर भावजय मृत्युमुखी पडले. तर नांदगाव तालुक्यातील न्यू पांझण परिसरातील डोरलीपाडा वस्तीजवळ दत्तू साहेबराव चव्हाण (१३) हा मुलगा मृत्युमुखी पडला.
........................
अकोला जिल्ह्यात एकाचा मृत्यू
अकोला जिल्ह्यातील कवठा येथील मोहन हरिभाऊ कुरवाळे यांचा वीज पडून मृत्यू झाला.
......................

Web Title: Kokan, Marathwada returning rains!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.