‘कोकण शिक्षक’ भाजपकडे, ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय; महाविकास आघाडीला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 07:48 AM2023-02-03T07:48:36+5:302023-02-03T07:49:29+5:30
Vidhan Parishad Election Result: मागील निवडणुकीत मतांच्या फाटाफुटीमुळे गमावलेला कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ भाजपने पुन्हा एकदा ताब्यात घेतला आहे.
नवी मुंबई/ अलिबाग : मागील निवडणुकीत मतांच्या फाटाफुटीमुळे गमावलेला कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ भाजपने पुन्हा एकदा ताब्यात घेतला आहे. विजयाची शक्यता असलेले आपल्या पक्षाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना भाजपकडून उभे करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेळी यशस्वी ठरली.
ज्ञानेश्वर म्हात्रे यांना २०,६८३ मते मिळाली, तर अपक्ष म्हणून रिंगणात असलेले शेकापचे बाळाराम पाटील यांना मागील वेळेपक्षा कमी १०,९९७ मते मिळाली. पाटील यांची भिस्त फक्त रायगड जिल्ह्यावर होती. मात्र, भाजपने सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवडणुकीची जबाबदारी दिली. भाजपप्रमाणेच त्यांना ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतून शिंदे गटाचेही पाठबळ मिळाले.
महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या तीन पक्षांचा पाठिंबा आणि रायगड जिल्ह्यातील शेकापची ताकद असूनही त्यांचा उमेदवार पराभूत झाला. या निवडणुकीला शिक्षक विरुद्ध संस्थाचालक असे स्वरूप देण्याची भाजपची खेळीही यशस्वी ठरली. या विजयामुळे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात राजकीय खेळीसाठी चांगला समन्वय असल्याचे दिसून आले.
शिंदे यांचा उमेदवार देऊन फडणवीस यांनी भाजपची एक जागा वाढवली. ही मतमोजणी कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांच्या देखरेखीखाली नेरूळमध्ये पार पडली.
शिक्षकांचे प्रश्न सोडविल्याचा फायदा
कोकण विभाग शिक्षण मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. २०१८ च्या निवडणुकीत भाजपमधील बंडखोरीमुळे शेकापचे बाळाराम पाटील विजयी झाले होते. मात्र, तेव्हा ज्ञानेश्वर म्हात्रे (शिवसेना) दुसऱ्या क्रमांकावर होते. पराभूत होऊनही त्यांनी शिक्षकांशी संपर्क ठेवला. त्यांचे प्रश्न हाती घेतले. त्याचा त्यांना फायदा झाला.
ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पहिली पसंती
- ज्ञानेश्वर म्हात्रे सुरुवातीपासून आघाडीवर होते आणि पहिल्याच पसंतीक्रमात विजयी झाले. ज्ञानेश्वर म्हात्रे यांना २०६८३, बाळाराम पाटील यांना १०९९७ मते पडली. गेल्यावेळेपेक्षा ती ८४० ने कमी आहेत.
- रायगडवगळता इतर जिल्ह्यात आघाडीला मते मिळविण्यात अपयश आले. गेल्यावेळी ज्ञानेश्वर म्हात्रे यांना ६,८८७ मते पडली होती. ती आता २० हजारांवर गेली. आघाडीचा उमेदवार म्हणून जरी बाळाराम पाटील यांचा पराभव झाला असला, तरी राजकीयदृष्ट्या हा शेकापला मोठा दणका असल्याचे बोलले जाते.