कोकणकन्येची शंभरी अमेरिकेत झाली साजरी

By admin | Published: May 8, 2017 06:07 AM2017-05-08T06:07:00+5:302017-05-08T06:07:00+5:30

सुमती गणेश टिळवे या मूळच्या कोकणकन्येचा शंभरावा वाढदिवस अमेरिकेत मराठमोळ्या वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा

Kokanakanya's 100th anniversary celebrates in America | कोकणकन्येची शंभरी अमेरिकेत झाली साजरी

कोकणकन्येची शंभरी अमेरिकेत झाली साजरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सुमती गणेश टिळवे या मूळच्या कोकणकन्येचा शंभरावा वाढदिवस अमेरिकेत मराठमोळ्या वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा झाला. या वाढदिवस सोहळ््यावर मालवणी, मराठी व भारतीय संस्कृतीची छाप होती. त्यांच्या या वाढदिवस सोहळ््यातून अस्सल मराठी संस्कृतीचे मनोहरी दर्शन अमेरिकेत घडले.
ठाण्यातील विजू नाटेकर रिक्षा-टॅक्सी युनियनचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते गोविंद गणेश उर्फ भाई टिळवे यांच्या त्या मातोश्री असून या समारंभाला मुलगा-मुलगी, बहिण-भाऊ, नातवंडे-पतवंडांसह सुमारे ३०० हितचिंतक उपस्थित होते. कॅलिफोर्निया राज्यातील सरिटोस येथील एका हॉटेलमध्ये साजऱ्या झालेल्या या शतकमहोत्सवी सोहळ््याला महापौर, आमदार, लोकप्रतिनिधी, डॉक्टर्स, वकील आदी मान्यवर उपस्थित होते. गणेशपूजन, नथ घालून नटलेल्या नऊवारी साड्यांमधील ललना, हाती कलश घेऊन घातल्या जाणाऱ्या पारंपरिक फुगड्या, केशरी फेट्यांधील पुरूषांचा वावर, लेझीमच्या ठेक्यात होणारी नाचगाणी, कुलदेवतेला घातले जाणारे खास मालवणी भाषेतील गाऱ्हाणे, हॅप्पी बर्थडेच्या उद््घोषात कापला जाणारा केक आणि निरांजनाच्या मंद प्रकाशात उत्सवमूर्तीला ओवाळणे आदी माध्यमातून तेथे मराठी संस्कृतीचे दर्शन घडले.
अभिनंदनपर भाषणे, शुभेच्छांचा वर्षाव, मनोरंजनात्मक कार्यक्रम, खास भारतीय मेनू यातून हा वाढदिवस संस्मरणीय झाला. त्यांच्यावरील कविता वाचन, दोन चिमुरड्या नाती-पणतींचा नाच, मुलींचा कोळी व कोकणी नाच, सहा ज्येष्ठ महिलांचा हवाई व फिलिपिनो संस्कृतीचा डान्स, टोपल्या व तांब्याचे तांबे हातात घेऊन घालण्यात आलेली नाच फुगडी आदी नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे या शतकमहोत्सवी सोहळ््याला रंगत आली. स्लाईड शोसह प्रासंगिक चित्रणाबरोबरच यावेळी कोकण दर्शनाचा चित्रपट दाखविण्यात आला. रुपाली टिळवे यांनी सूत्रसंचालन केले.
आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे, अमेरिकेत जन्मलेल्या मुलांना आणि कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्वांना कोकणभूमीचे, महाराष्ट्राचे आचार- विचार कळावेत, या हेतूने हा शतकसोहळा साजरा केल्याचे नमूद करुन भाई टिळवे यांनी सर्वांचे आभार मानले. काही जणांनी सुमतीबाईंना दिलेल्या रकमेत आपली भर टाकून भाई यांची मोठी बहिण अपर्णा हांडे यांनी कोलगाव येथील शाळेला बेंच तसेच पिण्याच्या पाण्यासाठी विहीर खोदून देण्यासाठी दहा हजार डॉलर्सची देणगी जाहीर केली.

खणखणीत आवाज
आयुष्याचे अद््भूत शतक पाहिलेल्या सुमतीबार्इंचा आवाज आजही खणखणीत आहे. स्मरणशक्ती छान आहे. चाणाक्ष नजर, दुडुदुडू चाल आणि त्यांची तब्येत उत्तम असून स्वत:च्या सर्व गोष्टी आजही त्या स्वत:च करतात. दिवसाचे साधारण पाच तास त्या तेथील फिलोमिना संस्थेच्या वृद्धाश्रमात घालवतात.

Web Title: Kokanakanya's 100th anniversary celebrates in America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.